Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येऊ कशी तशी मी नांदायला'च्या महाएपिसोडने प्रेक्षकांचा केला हिरमोड, व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 11:47 IST

ओम आणि स्वीटू अखेर सर्व संकटावर मात करत लग्न करतील, या आशेने प्रेक्षकांनी हा दोन तासांचा महाएपिसोड पाहिला. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची निराशा केली.

झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचा २२ ऑगस्टला दोन तासांचा विशेष भाग प्रसारीत करण्यात आला होता. मालिकेच्या प्रोमोमध्ये स्वीटू वरमाळा घेऊन उभी असते आणि अंतरपाट खाली पडताच तिच्या समोर वेगळेच काही तरी घडते या अविर्भावात येऊन ती स्तब्ध उभी राहते. हा उत्कंठा वाढवणारा महाएपिसोड मात्र काहीतरी वेगळाच होता. प्रत्यक्षात दोन तासाच्या भागात ओम लग्न सोडून दादांना शोधायला जाताना दाखवला आहे आणि इकडे लग्न मंडपात स्वीटू मात्र मोहितसोबत स्वतःचे लग्न उरकून घेते.

प्रोमोत दाखवला गेलेला ट्विस्ट प्रत्यक्षात प्रेक्षकांना कुठेच पाहायला मिळाला नाही. याउलट मोहित स्वीटूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न करून मोकळा होतो. ओम आणि स्वीटू अखेर सर्व संकटावर मात करत लग्न करतील, या आशेने प्रेक्षकांनी हा दोन तासांचा महाएपिसोड पाहिला. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची निराशा केली.

कारण दोन तास घालवून शेवटी मालिकेच्या लेखकाने ही कथा वेगळ्याच ट्रॅकवर नेऊन सोडली आणि म्हणूनच प्रेक्षकांनी या मालिकेबाबत संतापजनक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या मालिकेमुळे आमचे दोन तास फुकट गेले असेच चित्र आता या मालिकेबाबत निर्माण झाले आहे.  

मालिकेच्या प्रोमोमध्ये वेगळेच काहीतरी दाखवून या मालिका प्रेक्षकांची फसवणूक आणि पर्यायाने दिशाभूल करत आहेत अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आता व्यक्त करत आहेत. दरवेळी येणारे हे असह्य ट्विस्ट खरंच गरजेचे असतात का? यातून त्या मालिकेला नेमके काय साध्य करायचे आहे? असेही प्रश्न आता विचारले जात आहेत. 

टॅग्स :झी मराठी