अभिनेत्री शिल्पा शिंदे टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीपासून दुरावली होती. आता नुकतेच तिने तब्बल एका दशकानंतर 'भाबीजी घर पर हैं' मधील अंगूरी भाभीच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. कर्जतमध्ये शांततेत स्थायिक झाल्यानंतर पुन्हा एकदा शहरी जीवनाशी जुळवून घेणे तिच्यासाठी किती कठीण जात आहे, याबद्दल तिने नुकताच खुलासा केला.
'टाइम्स ऑफ इंडिया टीव्ही'शी बोलताना शिल्पाने सांगितले की, मुंबईत जन्म आणि शिक्षण होऊनही तिला आता शहराच्या धावपळीच्या आयुष्याशी जुळवून घेताना त्रास होत आहे. तिने असेही स्पष्ट केले की, मुंबईत तिची स्वतःची मालमत्ता नाही आणि सध्या ती भाड्याच्या घरात किंवा हॉटेलमध्ये राहत आहे. शहरातील जीवनाशी पुन्हा जुळवून घेण्याबाबत बोलताना शिल्पा शिंदे म्हणाली, "हो, हे कठीण होतं. माझ्यासाठी शोमध्ये परतण्याचा निर्णय अगदी अचानक झाला. मी जास्त विचार न करता या शोसाठी होकार दिला. जेव्हा आसिफजींनी फोन करून सांगितलं की 'चला करूया, सगळे तुला मिस करत आहेत', तेव्हा मी लगेच तयार झाले. मी पुन्हा विचारही केला नाही. मात्र, त्याच वेळी मला जाणीव झाली की मला काही गोष्टी सांभाळाव्या लागतील, कारण मी या जगापासून जवळपास दूर गेले होते. हे थोडं आव्हानात्मक होतं आणि खरं सांगायचं तर अजूनही आहे. मला तो (कर्जतचा) काळ खूप आठवतो. पण तुम्ही दोन बोटींवर पाय ठेवू शकत नाही, योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या मी ते थांबवलं आहे. पुढे काय होईल, हे मी नंतर सांगेन. मी सध्या एका संकल्पनेवर काम करत आहे, पण सध्या ते गुपितच ठेवणार आहे."
शहरात शिल्पाची होतेय घुसमटकर्जतमध्ये व्यतित केलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना शिल्पा म्हणाली, "हो, मला तिथली खूप आठवण येते कारण तिथे खूप शांतता आहे. त्याच्या तुलनेत शहरातलं जीवन खूपच गोंधळाचं वाटतं, सगळीकडे फक्त माणसंच माणसं दिसतात. परत आल्यानंतर काही दिवस मला गुदमरल्यासारखं होतं. मी विचार करत राहिले की हे किती विचित्र आहे, विशेषतः अशासाठी कारण माझा जन्म आणि संगोपन मुंबईतच झाले आहे."
शहरापासून दूर राहते, मुंबईत स्वतःची मालमत्ता नाहीशिल्पा पुढे म्हणाली, "मी शहरापासून जवळजवळ पूर्णपणे लांब गेले होते. आता माझ्याकडे इथे स्वतःची कोणतीही प्रॉपर्टी नाही आणि मी हॉटेल किंवा भाड्याच्या घरात राहते. मी कर्जतमध्ये पूर्णपणे स्थायिक झाले होते आणि भविष्यातही तिथेच राहण्याचा विचार करत आहे, कारण तिथे खूप शांतता आहे. त्यामुळे इथे परत आल्यावर इतक्या लोकांशी आणि सेटवरच्या सततच्या आवाजाशी मी कसं काय जुळवून घेणार, याचं मलाच आश्चर्य वाटलं."