अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) मराठी कलाविश्वातील सर्वांचे लाडके कपल आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे कपल नाटक, मालिका आणि चित्रपट अशा माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. याशिवाय हे दोघे सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि डान्स व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही ते दोघे खूप फिट आहेत. त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवणारा आहे. त्यामुळे त्यांचे चाहते नेहमी कौतुक करत असतात. ऐश्वर्या आणि अविनाश यांचा मुलगा अमेय (Amey Narkar)ला देखील सिनेइंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. सध्या तो अमेरिकेत शिक्षण घेतो आहे. दरम्यान आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अविनाश नारकर यांनी त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश नारकर यांनी अमेयच्या बालपणीचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, मन्या हॅप्पी बर्थडे बाबू...!! तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा बाळा....!! मनाने आणि मानाने इतका मोठा हो की आभाळ थिटं पडेल. माणूस म्हणून आणि तुझ्या कामातून असं कार्य कर की अख्खं जग तुझ्याशी जुडेल...!! लव्ह यू बब्बू. अविनार नारकर यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. अनेक जण या पोस्टवर अमेयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
अमेय नारकरला अभिनय, नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयातून त्याने बी.एम.एम. ची पदवी घेतली आहे. रुईयाच्या ड्रामा सर्कलच्या माध्यमातून त्याने अनेक एकांकिका व नाटकात काम केलं आहे. त्याने 'खरा इन्स्पेक्टर मागावर' या व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आता अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे आणि ते पूर्ण केल्यावर तो भारतात येऊन सिनेइंडस्ट्रीत काम करताना दिसेल.