Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' मालिकेत दिसणार बरखा बिश्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 14:56 IST

 तेनाली रामा ही मालिका टीव्हीवर येण्याआधीच यातील कलाकारांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. कृष्णदेवराय राजाच्या दरबारातील तेनाली रामा, या बुद्धिमान ...

 तेनाली रामा ही मालिका टीव्हीवर येण्याआधीच यातील कलाकारांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. कृष्णदेवराय राजाच्या दरबारातील तेनाली रामा, या बुद्धिमान व्यक्तिरेखेवर ही मालिका आधारित आहे. कठीणातील कठीण समस्या सोडवण्यासाठीही तेनालीकडे कल्पक उपाय असतो. कृष्ण भारद्वाज आणि प्रियंवदा कांत यांची निवड या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी करण्यात आली आहे. आता त्यांच्याबरोबरच, बरखा बिश्तही या मालिकेत आपल्याला दिसणार आहे. आपण या मालिकेचा एक भाग बनणार आहोत या गोष्टीचा बरखाला आनंद झाला आहे. तेनाली रामा या आगामी मालिकेत बरखा बिश्तचीसुद्धा एंट्री झाली आहे. ती या मालिकेत एक विनोदी पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ती देवी कालीमातेची भूमिका साकारणार आहे.  कालीमातेचा आर्शिवाद मिळाल्यानंतर तेनालीला शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होते. त्याच्या विनोदबुद्धीने प्रसन्न झालेली देवी तेनालीला कृष्णदेवराय राजाच्या दरबारात वैकतवी म्हणजेच विनोदी कवी बनण्याचा आशीर्वाद देते. बरखा आपल्या भूमिकेविषयी सांगते, ‘‘तेनाली रामासारख्या प्रसिद्ध लोककथेचा भाग होणे, ही माझ्यासाठी फारच आनंदाची बाब आहे. माझी भूमिका विनोदी असली तरी ती मालिकेतील एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि पडद्यावर मला देवीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा फारच वेगळी आहे आणि प्रेक्षक मला अगदी वेगळ्या रुपात पाहतील. या मालिकेतील माझी छोटीशी भूमिका प्रेक्षकांना आवडेल, याची मला खात्री आहे.’’ बरखाने कितनी मस्त जिंदगी या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. रामलीला या सिनेमातील भूमिकेमुळे ती प्रसिद्धी झोतात आली.