Join us

​विकता का उत्तर लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 10:51 IST

रितेश देशमुखने हे बेबी, अपना सपना मनी मनी, क्या सुपर कूल है हम, मस्ती, ग्रँड मस्ती यांसारख्या अनेक चित्रपटात ...

रितेश देशमुखने हे बेबी, अपना सपना मनी मनी, क्या सुपर कूल है हम, मस्ती, ग्रँड मस्ती यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. लय भारी या त्याच्या पहिल्याच मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. मोठ्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर रितेशने विकता का उत्तर या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर आगमन केले. या त्याच्या कार्यक्रमालादेखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. विकता का उत्तर या कार्यक्रमाची संकल्पना आतापर्यंतच्या छोट्या पडद्यावरील सगळ्या गेम शोपेक्षा वेगळी होती. या कार्यक्रमात स्पर्धकासोबतच स्टुडिओमध्ये बसलेल्या लोकांनादेखील हा खेळ खेळता आला आणि योग्य उत्तर देण्यासाठी त्यांना पैसेदेखील मिळाले. रितेशने या कार्यक्रमाचे केलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूप आवडले होते. रितेशने त्याच्या खास शैलीत पहिल्या भागापासून सगळ्या स्पर्धकांशी संवाद साधला. प्रेक्षकांशी बोलताना तो त्याचे स्टारपण बाजूला ठेवत असे आणि एक सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारत असे. त्याची हीच गोष्ट प्रेक्षकांना खूप भावली. या कार्यक्रमाने मराठी लोकांना एक व्यासपीठ मिळवून दिले होते. तसेच या कार्यक्रमाने अनेकांची स्वप्नेदेखील पूर्ण केली. कित्येक स्पर्धकांच्या इच्छाआकांक्षा या कार्यक्रमाने पूर्ण केल्या. अनेकांनी आपल्या आयुष्यातील भावनिक क्षणांना या गेम शोच्या मंचावर वाट मोकळी करून दिली. या गेम शोने स्वतःचे एक वेगळेपण निर्माण केले. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. विकता का उत्तरचा पहिला सिझन लवकरच संपणार असला तरी दुसरा सिझन पुढील काळात प्रेक्षकांच्या नक्कीच भेटीस येणार आहे. या दुसऱ्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहातील यात काही शंकाच नाही.