Join us

​अशोक लोखंडे झळकणार टिव्ही, बिवी और मैं या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 11:19 IST

अशोक लोखंडे सध्या तू सुरज मैं सांज पियाजी या मालिकेत झळकत आहे. या मालिकेनंतर आता ते टिव्ही, बिवी और ...

अशोक लोखंडे सध्या तू सुरज मैं सांज पियाजी या मालिकेत झळकत आहे. या मालिकेनंतर आता ते टिव्ही, बिवी और मैं या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विविध छटा आहेत. एक वडील, एक मित्र, एक पती, एक आजोबा अशा त्यांच्या भूमिकेला विविध छटा असून सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य अतिशय मजेशीर पद्धतीने जगणाऱ्या माणसाची ते व्यक्तिरेखा साकारत आहेत. या मालिकेत ते एक विनोदी भूमिकेत झळकणार आहेत. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी सोनपरी या मालिकेत एक विनोदी भूमिका साकारली होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांना विनोदी भूमिका साकारण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी ते खूपच उत्सुक आहेत. टिव्ही, बिवी और मैं या मालिकेत अशोक लोखंडे यांचा मुलगा एक निर्माता असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या प्रसिद्धीमुळे ते नेहमीच सगळ्यांसमोर बढाया मारत असतात. पण घरी हाच त्यांचा निर्माता मुलगा आई आणि बायको यांच्यात फसलेला दाखवण्यात आला आहे. आपल्या मुलाची तो नेहमी मजा लुटत असतो. ही भूमिका साकारायला अशोक लोखंडे यांना खूप मजा येत आहे. ते सांगतात, या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा खूपच मजेशीर आहे. मी खऱ्या आयुष्यात नेहमीच खूप आनंदी आणि प्रसन्न असतो. मला लोकांची करमणूक करायला खूप आवडते. मी सेटवर देखील नेहमी धमाल मस्ती करत असतो. त्यामुळे मी सेटवर असल्यास माझे सहकलाकार खूपच खूश असतात. माझ्या व्यक्तिमत्त्वातल्या याच छटा मी बाऊजींच्या व्यक्तिरेखेतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.