Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैराट चित्रपटातील हा कलाकार काम करणार कृष्णा अभिषेकसोबत द ड्रामा कंपनीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 15:51 IST

कृष्णा अभिषेकचा द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळणार ...

कृष्णा अभिषेकचा द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात नानीच्या भूमिकेत प्रेक्षकांना अली असगरला पाहायला मिळाला होता. पण काही महिन्यांपूर्वी कपिल शर्मा आणि त्याची टीम सिडनीला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली होती. तिथून परतत असताना कपिलने दारूच्या नशेत सुनील ग्रोव्हरसोबत भांडणे केली होती. त्याचसोबत त्याने अली असगरला देखील अतिशय वाईट शब्दांत सुनावले होते. त्यामुळे अली आणि सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. पण आता अली कृष्णाच्या द ड्रामा कंपनीमध्ये झळकणार आहे.
द ड्रामा कंपनीत प्रेक्षकांना रिधिमा पंडित देखील दिसणार आहे. रिधिमा पंडित बहू हमारी रजनीकांत या कार्यक्रमामुळे नावारूपाला आली. तसेच सुदेश लहेरी या कार्यक्रमाचा भाग आहे. या सगळ्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना आणखी काही प्रसिद्ध चेहरे या कार्यक्रमात पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात एका मराठी चित्रपटातील कलाकार देखील दिसणार आहे. सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील परशा आणि आर्ची या व्यक्तिरेखा तर प्रचंड गाजल्या होत्या. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांना या पहिल्याच चित्रपटाने स्टार बनवले. त्यांच्यासोबतच या चित्रपटातील इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. आता द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात प्रेक्षकांना तानाजी गळगुंडेला पाहायला मिळणार आहे. सैराट या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तानाजी द ड्रामा कंपनी या मालिकेद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.
सुदेश आणि कृष्णा यांची जोडी तर खूपच प्रसिद्ध आहे. त्याचसोबत आता सुदेशची जोडी तानाजीसोबत देखील जमणार आहे. 



Also Read : ​सैराट फेम रिंकू राजगुरूचे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का?