Join us  

Appi Amchi Collector : छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?; अप्पीच्या उत्तरानं चाहते खुश्श, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 1:21 PM

Appi Amchi Collector Promo : प्रोमो आहे अप्पीच्या मुलाखतीचा.  यात अप्पीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अप्पीनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल.

Appi Amchi Collector Promo  : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरची मालिका सध्या जाम चर्चेत आहेत. कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी अप्पी आणि या मार्गात तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणी असं कथानक असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. होय, अप्पीचं कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसतेय. अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात येणार आहे. याच मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रोमो आहे अप्पीच्या मुलाखतीचा.  यात अप्पीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अप्पीनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल.

ज्येष्ठ वकील उज्जल निकम आणि आयएएस ऑफिसर विश्वास पाटील अप्पीची मुलाखत घेत आहेत 'छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?' असा प्रश्न अप्पीला मुलाखतीत विचारला जातो. यावर उत्तर देताना अप्पी म्हणते, 'तसं तर अनेक इतिहासकारांनी प्रत्येक पुस्तकात वेगळी नोंद केली आहे. वेगवेगळे संदर्भ आहेत. त्यांची उंची अंदाजे पाच फूट पाच इंच ते पाच फूट आठ इंच एवढी असेल.' त्यावर मला ठाम उत्तर हवंय असं मुलाखत घेणारे म्हणतात. त्यावर उत्तर देत अप्पी म्हणते, 'मॅडम... चार हजार सहाशे चार फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केलाय. साडेतीनशे वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी मोजायची, नाही का?' अप्पीचं हे उत्तर ऐकून मुलाखत घेणारेही प्रभावित होतात.सध्या मालिकेचा हा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. चाहत्यांनी या प्रोमोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अप्पीनं दिलेलं उत्तर ऐकून चाहतेही इम्प्रेमस झालेले दिसत आहेत.

नक्कीच मुलाखत काल्पनिक असली तरी मात्र ह्या प्रश्नाचं उत्तराने हृदय जिंकून घेतलं, असं एका युजरने म्हटलं आहे. मस्तच उत्तर दिलं. ऐकून अंगावर काटाच आला, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. 

टॅग्स :टेलिव्हिजनझी मराठीमराठी अभिनेताछत्रपती शिवाजी महाराज