नवरात्री उत्सवात बरेच सेलिब्रेटी हटके फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. असेच यंदा रात्रीस खेळ चाले फेम शेवंता उर्फ अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने हटके फोटोशूट केले आहे आणि त्यामुळे ती चर्चेत आली आहे. अपूर्वा नेमळेकरने वेगवेगळ्या देवीच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अगदी कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी, जय गौरी दुर्गा परमेश्वरी, जगदंबा माता राशीनची देवी, त्रिणयन दुर्गामाता, एकविरा देवी, चंद्रपूरची महाकाली, सरस्वती अशा देवीच्या विविध रूपातील तिचे फोटोशूट तिच्या चाहत्यांना देखील खूपच भावले आहे. मात्र तिच्या काही चाहत्यांनी या फोटोशूटवर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. या नाराजीवर अपूर्वाने उत्तर देखील दिले आहे.
अपूर्वा नेमळेकरच्या फोटोशूटवर नाराज झालेल्या सोशल मीडियावरील एका युजरने म्हटले की, “डिसलाइक, डिसलाइक, १०० टक्के डिसलाइक.आपण एवढे पूजनीय नसतो, सांगितले ना, देव देवीच्या चेहऱ्याला आपले चेहरे मार्फ करून लावायला, बस्स झाले नका खेळू आमच्या भावनांशी. आणि वाटलं तर हा फोटो बनवून तूम्ही घरात लावा, बघत बसा. पण कृपया लोकांवर काहीही नका लादू. कळत नाही एकदा पोस्टला कॉमेंट देऊन. आणि जितक्या वेळा तुम्ही माझे कमेंट डिलिट कराल, मी तितक्यांदा हीच सेम कमेंट्स आणि लोकांमध्ये याबद्दल जागृती करणार, मग तूम्ही कुठेही हा मार्फ पिक टाका.” चाहत्यांच्या या नाराजीवर अपूर्वाने नुकतेच एक उत्तर दिले आहे त्यात ती म्हणाली की, मी व माझ्या सहकाऱ्यांनी, प्रत्यक्ष-वा-अप्रत्यक्ष असा कधीच दावा केला नाही आम्ही दैवी व्यक्तिमत्त्वे आहोत. मी, आणि माझे सहकारी निव्वळ कलेचे उपासक आहोत. हा प्रकल्प,ही आमची एक संकल्पना आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही, देवीचे विविध रुप आणि त्या विशिष्ट शक्तीपीठाची महती भविकांपर्यंत पोहोचवण्याचा, एक निखळ प्रामाणिक प्रयत्न आहे.