Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्यासमोर तीन जणांना समुद्रातून वाचवलं...", अंशुमन विचारेने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:07 IST

"निसर्गासमोर माणूस किड्या मुंग्यांसारखा आहे...

मराठी अभिनेताअंशुमन विचारे नुकताच कुटुंबासोबत कोकणात फिरायला गेला होता. तिथे समुद्रात गेलेल्या तीन जणांना आपल्या डोळ्यांदेखत बाहेर काढल्याची घटना अंशुमनने पाहिली. हे पाहून तो अस्वस्थ झाला आहे. त्याने पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला. तसंच निसर्गासमोर आपलं काहीच चालत नाही, निसर्गाशी मैत्री करा असा सल्लाही त्याने दिला. नक्की काय घडलं वाचा.

अंशुमन विचारेने व्हिडीओ शेअर केला आहे. तो म्हणतो, "आम्ही गुहागरच्या वेलदुर्ग मध्ये आहोत. तिथल्या प्रायव्हेट बीचवर आहोत. इथे मी फिरायला आलोय. इतर सगळे लोकही फिरायला आलेत. आमच्या पुढ्यात घडलेली गोष्ट म्हणजे तीन माणसं ज्यांना पोहता येत नाही ते समुद्रात एकदम आतमध्ये गेले होते. मुळात असा शहाणपणा करायचा कशाला? त्यातील दोघांना वाचवलं. तिसरा जवजवळ बेशुद्ध आहे. त्याला गार्डने खेचून आणलं आहे. आम्ही सगळे इथून पाहतोय पण काहीच करु शकत नव्हतो. कारण आम्हाला कोणालाच पोहता येत नाही. पण आमच्यासोबतच्या अक्की पवारने तातडीने गार्डला, पोलिसांना फोन केला. सगळे वेळीच आले. त्यांना रुग्णालयात नेलं आहे. मला वाटतं प्रत्येकाने अशा ठिकाणी गेल्यावर काळजी घ्या. मजा करा, आनंद घ्या पण काळजीही घ्या नाहीतर आनंदावर विरजण पडतं."

यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "निसर्गासमोर माणूस किड्या मुंग्यांसारखा आहे, निसर्गा शी मैत्री करा पण त्याची मस्करी करू नका काल अत्यंत भयानक घटना डोळ्यादेखत घडली आणि खूप लोक असून ही काहीही करू शकलो नाही कारण आमच्या समोर झुंज देण्यासाठी होता विशाल समुद्र ज्याने शेवटी एक जीव घेतलाच, आणि खर सांगतो असे video पाहताना नेहमी राग येतो की कुणी काहीच का करत नाहीये पण खरच काहीच करता येत नाही नशीब चांगल होत की आम्ही अन्वीच्या हट्टा पायी तेथे होतो आणि आमच्या सोबत होता आमचा मित्र अक्षय पवार जो तिथलाच असून त्याने लगेच फोन करून प्राइवेट स्पीड बोट बोलावली म्हणून बाकीचे दोघे वाचले , काळजी घ्या सगळ्यांनी."

या व्हिडीओमध्ये अंशुममने तो प्रसंगही दाखवला आहे जेव्हा एका माणसाला उचलून किनाऱ्यावर आणण्यात आलं. तो बेशुद्धअवस्थेतच होता तर त्याच्यासोबतचे अक्षरश: रडत होते. जीवावर बेतणारा असा प्रसंग प्रत्यक्षात पाहून अंशुमन आणि त्याची पत्नी चिंतेत पडले. म्हणून त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत सर्वांना जागरुक केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Anshuman Vichare shares video of saving three from sea.

Web Summary : Actor Anshuman Vichare witnessed three people being rescued from the sea in Guhagar. He shared a video urging caution and respect for nature after a near-drowning incident. One person was nearly unconscious.
टॅग्स :अंशुमन विचारेमराठी अभिनेताव्हायरल व्हिडिओ