Join us
Daily Top 2Weekly Top 5

"काय सांगू किती भारी वाटलं..!", बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 11:58 IST

Prajakta Mali : प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिला बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी थेट व्हिडीओ कॉल लावला होता, हे समजते आहे.

अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून कौन बनेगा करोडपती शोचं सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची इच्छा पूर्ण करताना ते दिसतात. नुकतेच कौन बनेगा करोडपती शोमध्ये सहभागी झालेल्या अजय नावाच्या एका स्पर्धकाने तो प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता आहे असे अमिताभ बच्चन यांना सांगितले. त्या स्पर्धकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिग बींनी शोच्या आयोजकांना प्राजक्ता माळीला फोन लावायला सांगितला. 

बिग बींनी प्राजक्ताला लावला व्हिडीओ कॉल...

प्राजक्ताला फोन लावल्यावर बिग बींनी तिचं स्वागत केलं. प्राजक्ताने अजयला चांगलं खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय तू जिंकलास, तर आपण नक्की भेटू असेही त्याला सांगितले. यानंतर प्राजक्ताने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आणि तुम्ही असेच आमच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमावर प्रेम करत राहा असे त्यांना सांगितले. प्राजक्ताने हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्राजक्ताने चाहत्याचे मानले आभार

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, काय सांगू किती भारी वाटलं. अशा पद्धतीनं कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात सहभागी होईन असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी नेहमी म्हणते; चाहते माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभ आहेत.आणि बघा, हे अगदी खरं आहे. अजय मुळे ते शक्य झालं. #केवळप्रेम. सोनी टेलिव्हिजनची टीम पण इतकी खूष झाली होती की त्यांनीही फार आनंदानं खूप सहकार्य केलं. त्यांचेही मनापासून आभार..

.तिने पुढे म्हटले की, आणि सरते शेवटी आमचे लाडके सोनी मराठी - महाराष्ट्राची हास्यजत्रेचे अमित फाळके; अमिताभजींशी अशा पद्धतीच्या कार्यक्रमात नेमके काय-किती-कसे बोलावे ह्या विषयी मनात अनेक प्रश्न होते, ज्यात यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. आणि मला लाभलेल्या ह्या संधीसाठी त्यांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद. #लाखमोलाचेक्षण #आठवण #सुगंधीकूपी #मायबापप्रेक्षक #कृतज्ञ .

टॅग्स :प्राजक्ता माळीकौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन