Join us  

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात, अध्यक्ष प्रशांत दामलेंनी टोचले सरकारचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 1:55 PM

आम्ही ३ तासच नाटक करतो, तुम्ही ३६५ दिवस अभिनय करता, प्रशांत दामलेंनी राजकारण्यांनाच लगावला टोला

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड येथे हे संमेलन पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. परंपरेनुसार सकाळी नाट्य दिंडीही काढण्यात आली. दिंडीत अनेक कलाकारांनी आणि नाट्यप्रेमींनी सहभाग घेत उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवला. तर काल पुण्यात नाट्यसंमेलनाचा शुभारंभ झाला. उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

पुण्यात तब्बल २५ वर्षांनंतर नाट्य संमेलन पार पडत आहे. पहिल्यांदाच  नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवत असलेले अभिनेते प्रशांत दामलेंनी  मनोगत व्यक्त केलं. व्यासपीठावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री उदय सामंत या दिग्गज नेत्यांसमोरच प्रशांत दामलेंनी त्यांच्या खास शैलीतून राजकारण्यांचेच कान टोचले. ते म्हणाले,"आम्ही कलाकार फक्त तीन तास नाटक करतो. मंचावर उपस्थित हे ३६५ दिवस २४ तास अभिनयच करत असतात. त्यांच्या कार्याला सलाम.हे अचानक अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. पण उत्तम गोष्ट ही की माझे सहकारी माझेही बाप आहेत."

ते पुढे म्हणाले, 'नाट्यसंमेलन हे कलाकारांसाठी दिवाळी आहे. आपण २२ ठिकाणी नाट्यजागर घेतोय. यामध्ये विविध एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा आहेत. यामध्ये आतापर्यंत ६७०० रंगकर्मींनी सहभाग नोंदवला आहे. आपण लवकरच १० हजार आकडा पार कडू अशी मला आशा आहे.'

सरकारचे टोचले कान 

प्रशांत दामले म्हणाले, 'मी अध्यक्षपद नसातानाही आमच्या अनेक समस्या सरकारसमोर मांडल्या आहेत. सरकारने दिलेला निधी योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे यासाठी मला इथे बसवलं आहे. नाट्यगृह बांधणं, ते मेन्टेन करणं ही खूप काही अवघड गोष्ट नाही बरं का सीएम साहेब. फक्त योग्य माणसं तिथे बसली ना की काम आरामात होईल. परवा सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितलं की ७० नाट्यगृह बांधणार आहोत. त्याबद्दल आमच्या कलाकारांमध्ये आनंदाची लहर आहे. पण आहेत ती नाट्यगृह मेन्टेन करणं हे एका बाजूला. नाट्यगृहांवर सोलर सिस्टीम बसवणं अत्यंत गरजेचं आहे. '

प्रशांत दामलेंनी मांडलेल्या या अडचणींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ते सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय तुमच्यासारखा आम्ही अभिनय करु शकत नाही असंही उत्तर त्यांनी दामलेंना दिलं. शेवटी तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स आहे यात रिटेक नाही त्यामुळे तुमची कला फार अवघड आहे असंही ते म्हणाले.

टॅग्स :मराठी नाट्य संमेलनपुणेप्रशांत दामलेएकनाथ शिंदेशरद पवार