Ashadhi Ekadashi 2025: आषाढ महिन्यातील पंढरीची वारी ही खूप जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या, पालख्या येतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे आषाढी एकादशीचे मोठे महत्त्व आहे. दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज रविवारी आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात पोहचले आहेत. संपुर्ण महाराष्ट्राला सावळ्या विठुरायाचे वेड लागले आहे. अनेक कलाकारांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्यात. अभिनेता अक्षय केळकर यानेदेखील खास पोस्ट शेअर केली आहे.
अक्षय केळकर याने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेले काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टमध्ये विठ्ठलाच्या मुर्तीसोबतचे अत्यंत मनमोहक फोटो पाहायला मिळत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि शांततेने भारलेल्या या फोटोंनी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण केली आहे. अक्षयच्या चेहऱ्यावर दिसणारी भक्तिभावना आणि समाधान स्पष्टपणे जाणवतं. अगदी मन मोहवून टाकणारे हे फोटो आहेत. अक्षयनं फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहलं, "माझा विठुराया". अनेक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर कमेंट केल्यात.
अक्षयनं शेअर केलेले हे फोटो पाहून चाहत्यांना वाटलं की तो एखाद्या मोठ्या मंदिरात गेला असावा, पण ही मूर्ती अक्षयच्या स्वतःच्या घरातील आहे. अक्षय केळकर यानं मुंबईतील त्याच्या घरात विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे. याआधीही अक्षयनं त्याच्या घरातील विठ्ठल मूर्तीचे फोटो शेअर केलेले आहेत. अक्षय केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'बिग बॉस मराठी ४' चं विजेतेपद पटकावलं होतं. हे पर्व जिंकल्यानंतर त्याच्या करिअरला चांगलाच वेग आला. आतापर्यंत त्यानं अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांममध्ये काम केलं आहे.