Join us  

'अजूनही बरसात आहे' मालिकेतील 'या' अभिनेत्रीने घेतला तात्पुरता ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:04 AM

अजूनही बरसात आहे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या मालिकेतील अभिनेत्री लवकरच एका नव्या मालिकेत आणि एका नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. त्यामुळे अजूनही बरसात आहे या मालिकेत त्या अभिनेत्रीने ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे उमा सरदेशमुख. उमा सरदेशमुख अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजच्या आईची भूमिका साकारत आहेत. उमा सरदेशमुख यांनी या मालिकेत साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. 

उमा सरदेशमुख या नव्याने सुरू झालेली मराठी वाहिनी सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या कन्यादान मालिकेतील भूमिकेचे नाव आहे आशालता. “आजपर्यंत माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत, आता येते आणखी एका नवीन भूमिकेत…आशालता…एक वेगळी भूमिका एक वेगळा अनुभव. “कन्यादान” आजपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता नक्की बघा…” असे त्यांनी आपल्या नव्या भूमिकेबाबत सांगितले. त्यामुळे उमा सरदेशमुख आता अजूनही बरसात आहे या मालिकेतून तूर्तास तरी ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अजूनही बरसात आहे मालिकेत सध्या मनू आणि मल्हारचे लग्न झाले आहे आणि आता आदिराजच्या घरातले त्याच्या लग्नासाठी मागे लागले आहेत. मीराने अद्याप आदिराजला लग्नासाठी होकार दिलेला नाही. आदिराजच्या आईला त्याचे लग्न मीराशी व्हावे असे वाटते आहे. तर त्याच्या वडिलांना त्यांनी ठरवेल्या मुलीशी लग्न व्हावे असे वाटत आहे. मीराच्या मागे लग्नासाठी निखिल लागला आहे. तर तिच्या घरातल्यांनाही निखिलचे स्थळ आवडले आहे. त्यामुळे आता मीरा आणि आदिराजचे लग्न होते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.