‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजते आहे. शनाया, गुरुनाथ आणि राधिका यांची जुगलबंदी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे शनाया या व्यक्तिरेखेचा. अभिनेत्री रसिका सुनील हिने ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. मौजमजा आणि धम्माल जीवन जगण्यासाठी गॅरी म्हणजेच गुरुनाथला आपल्याकडे आकर्षित करणारी शनाया ही भूमिका रसिकाने मोठ्या खुबीने रंगवली आहे. त्यामुळे शनाया या पात्रावर प्रेम करणारे आणि तिचा तिरस्कार करणारे असे दोन्ही प्रकारचे रसिक आहेत. शनाया म्हणजे रसिकाच्या मालिकेतील कारनाम्यांमुळे तिच्या रिअल लाइफमध्ये काय सुरू असते हे जाणून घेण्याचीही रसिकांना तितकीच उत्सुकता असते. रसिका सुनील नेहमीच तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपर्यंत तिच्या शेअर केलेल्या फोटोंमधील अधिकाधिक फोटो हे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत असायचे. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो, प्रत्येक क्षणाचे फोटो रसिकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे रिल लाइफमध्ये गॅरीवर लट्टू होणारी शनाया म्हणजेच रसिकाचा रिअल लाइफ गॅरी हा सिद्धार्थ चांदेकर तर नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण या दोघांनी याबाबत नेहमीच मौन राखणेच पसंत केले होते. पण आता सिद्धार्थ आणि रसिकाचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा आहे.
सिद्धार्थ आणि रसिका पूर्वीप्रमाणे सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत नसल्याने त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यात सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी एका दुसऱ्याच अभिनेत्रीसोबतचा एक डबस्मॅश व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही अभिनेत्री मिताली मयेकर असून या व्हिडिओत सिद्धार्थ मितालीला 'मी काही तुझा भाऊ नाही, मला भाऊ म्हणू नको' असे म्हणत आहे तर दुसरीकडे मिताली आणि सिद्धार्थने मनगटावर एकत्र टॅटू देखील काढले आहेत. त्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना चांगलाच ऊत आला आहे.
Also Read :
सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांचा जुना फोटो पाहिला का?