Urmila Nimbalkar: भारत-पाकिस्तान देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्ताननं गुरुवारी रात्री भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडलं. मात्र, भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही. या सर्व घडामोडीदरम्यान सर्व स्तरातून जवानांचं कौतुक होत आहे. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हिनं सोशल मीडियावर भारतीय लष्करासाठी पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय लष्कर सीमेवर शत्रुशी दोन हात करत असताना सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, हे अगदी समर्पक शब्दात अभिनेत्रीनं सांगितलं. तिनं पोस्टमध्ये लिहलं, "सध्या जे चाललंय त्या सगळ्यात आम्ही भारतीय म्हणून देशाच्या बाजूने उभे आहोत. आपण सीमेवर नाही जाऊ शकत. पण, मला वाटतं या सगळ्यात आपण काय करू शकतो. तर सर्व सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची कृतज्ञता व्यक्त करुन आपलं जे काम आहे, ते प्रामाणिकपणे करत राहूया. आपण इथे शांततेत मेहनत करून देशाला मदत करू शकतो. जय हिंद!". अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवत सैनिकांचे आभार मानलेत.
सध्या भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पूंछ भागात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानने इतर राज्यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळवून लावला आहे. भारताने पाकिस्तानचे जवळपास ५० ड्रोन पाडले आहेत. उधमपूर, संभा, जम्मू, अखनूर आणि पठाणकोट या ठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि हे ड्रोन हाणून पाडले. या तणावाच्या परिस्थितीत आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.