जया भट्टाचार्य हे दहा वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरचे एक महत्त्वाचे नाव मानले जात असे. त्या काळात तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्या काळात अनेक निर्माते तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असत. टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरची तर ती प्रचंड लाडकी होती. एकताच्या अनेक मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, जया सध्या आर्थिक संकटात अडकली आहे.
जया भट्टाचार्यने टेलिचक्कर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ती गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात अडकली आहे. जयाची आई सध्या रुग्णालयात आहे. जयाच्या आईला हृदयाशी संबंधित आजार झाला असून या आजारपणात जयाने आजवर कमवलेले सगळे पैसे संपले आहेत. तिने तिच्या मुलाखतीत सांगितले आहे की, माझ्या आई वडिलांनी काही दिवसांपूर्वी लखनऊला जायचे ठरवले होते. मी माझ्या घरातील रिनोवेशन आणि इंटेरियरचे काम देखील त्या वेळात काढले होते. तोपर्यंत सगळे काही सुरळीत सुरू होते. पण माझी आई अचानक आजारी पडली. ती आता आयसीयुत असून तिच्या उपचारासाठी खूप पैसे लागत आहेत. तसेच रिनोवेशनमुळे देखील माझे भरपूर पैसे खर्च झाले आहेत. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. पण या सगळ्यात हार मानायचे नाही असे मी ठरवले आहे. मात्र मला कामाची नितांत गरज आहे. मला काम मिळाल्यास मी या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडेल याची मला खात्री आहे.