मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) हिने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सोनालीने स्टार प्रवाहच्या गणेशोत्सवात हजेरी लावली होती. त्यानंतर ती स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली. तर सोनाली खरे नशीबवान या मालिकेत दिसणार आहे.
जवळपास १० वर्षांनंतर सोनाली खरे पुन्हा मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी स्टार प्रवाहच्या बे दुणे दहा मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली होती. नशिबवान मालिकेच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. उर्वशी असं तिच्या पात्राचं नाव आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे. ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही.
खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री
उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाली की, स्टार प्रवाह परिवाराचा मी भाग होतेच पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे आवडतं माध्यम आहे. नशिबवान मालिकेत उर्वशी हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. खूप उत्सुकता आहे. चित्रपट, वेबसीरिज, माझी निर्मिती संस्था यात प्रचंड व्यस्त होते. मात्र तरीही मालिकेत काम करण्याची इच्छा होती. या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मला मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली.
''यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे...''
सोनाली पुढे म्हणाली की, स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी नावाजलेली निर्मिती संस्था असा छान योग जुळून आलाय. उर्वशी अतिआत्मविश्वासू आणि स्वार्थी आहे. हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे कस लागतोय. गणेशोत्सवाच्या धामधूमीत मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आणि नशिबवान मालिका आवडेल याची खात्री आहे.