Join us

अभिनेत्री ऋतुजा देशमुख झळकतेय '३६ गुणी जोडी'मध्ये, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 18:50 IST

Rujuta Deshmukh : '३६ गुणी जोडी' या मालिकेत ऋतुजा देशमुश एका अत्यंत साध्या गृहिणीची भूमिका साकारताना दिसते आहे.

अभिनेत्री ऋतुजा देशमुख(Rujuta Deshmukh)ने बऱ्याच मराठी मालिकेत काम केले आहे. आता ती झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेचं नाव आहे ३६ गुणी जोडी. या मालिकेत ऋतुजा देशमुश एका अत्यंत साध्या गृहिणीची भूमिका साकारताना दिसते आहे.

या मालिकेबद्दल ऋतुजा देशमुखने सांगितले की, ही कथा तरुणांशी संबंधित आहे. माझ्या मते तरुणांसह सर्व पिढ्यांनी ही मालिका पाहावी कारण लग्न जुळवण्यामध्ये  नवरा नवरीचे ३६ गुणी जुळणे अशी एक कल्पना आहे आणि या मालिकेत हे बघणे मजेशीर असेल. या मालिकेत नायक आणि नायिका दोघांचे वेगळे दृष्टिकोन असल्याने दोघांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. नायक हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे व तो  स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम आणि मेहनती असतात. ह्या उलट नायिकेला डॉक्टर व्हायचं आहे आणि तिला स्त्री क्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. मला नायिकेच्या आईची भूमिका निभावताना खूप आनंद होतो आहे. 

तिने पुढे भूमिकेबद्दल सांगितले की, माझी भूमिका एक साध्या सुध्या आईची भूमिका आहे पण ती मुलीला डॉक्टर बनण्याच्या भूमिकेला मनापासून साथ देते. मी या मालिकेत सुमन तुम्पलवार नावाची भूमिका साकारत आहे. ती अतिशय साधी गृहिणी आहे, आणि खूप साधं जीवन जगणारी आहे. तिचा नवरा अण्णा तुम्पलवार डॉक्टर पेशाला जपणारा माणूस आहेत. रुग्णांची मनापासून काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करतात. त्यांचं दोघांचंही आपल्या मुलींवर खूप प्रेम आहे. 

सहकलाकारांबद्दल सांगायचं झाल तर आम्ही खूप मज्जा करतो आणि आमची खूप चांगली गट्टी जमली आहे. अवि दादा (अविनाश नारकर) खूप छान मार्गदर्शन करतो. आम्ही आता एक छान कुटुंब झालो आहोत, असे ऋतुजाने सांगितले.