Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांपासून गायब आहे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:16 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधाम सोसायटीतील सदस्य प्रमुख भूमिकेत आहेत. हे सगळे कलाकार आपल्याला मालिकेत दररोज ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधाम सोसायटीतील सदस्य प्रमुख भूमिकेत आहेत. हे सगळे कलाकार आपल्याला मालिकेत दररोज पाहायला मिळतात. पण त्याचसोबत या मालिकेत काही कलाकार आपल्याला छोट्या भूमिका साकारताना दिसतात. विशाल ठक्कर या अभिनेत्याने या मालिकेमध्ये अनेकवेळा छोट्या भूमिका साकारल्या आहेत. विशाल गेल्या दीड वर्षांपासून गायब आहे. त्याची आई दुर्गा ठक्कर आजही त्याचा शोध घेत आहे. पण तो कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे हे कोणालाच माहीत नाहीये.
विशाल गायब झाल्यावर त्याच्या आईने पोलिसांमध्ये तक्रारदेखील नोंदवली होती. त्याला शोधण्यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहे. पण तिला यात यश मिळत नाहीये. त्याच्या आईने नुकतीच दैनिक भास्करच्या वेबसाईटला मुलाखत दिली आहे. तिने या मुलाखतीत सांगितले आहे की, माझा मुलगा आज तरी घरी परतेल किंवा मला फोन करेल अशा आशेने मी रोज सकाळी उठते. दोन वर्षं झाली तरी माझा मुलगा अजूनही गायब आहे. पोलिसांकडे विशालबाबत काहीही माहिती नाहीये. पण मी अजूनही आशा सोडलेली नाहीये. माझा मुलगा परतणार याची मला खात्री आहे. 



विशाल गायब व्हायच्या दोन महिने आधी एका २५ वर्षीय अभिनेत्रीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. विशालने त्या अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला असे तिने तक्रारीत म्हटले होते. पण याविषयी त्याची आई सांगते, विशालचे ज्या मुलीवर प्रेम होते, तिला मी देखील ओळखत होते. ती आमच्या घरात राहात होती. माझ्या मुलाला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. पण ती माझ्या मुलाला फसवत असल्याचे आम्हाला कळले. विशालसोबत अफेअर असताना तिचे आणखी एका मुलासोबत देखील अफेअर सुरू होते आणि त्या मुलाच्या मदतीने ती विशालला धमकावत होती. हे सगळे सुरू असताना स्वतः निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने विशालवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तिच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाहीये. 
विशालने संजय दत्तसोबत मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये काम देखील केले आहे. तसेच अपने, वक्तः द रेस अगेन्स्ट टाइम यांसारख्या चित्रपटात देखील तो झळकला होता. 

Also Read : ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनची शाहरुख खानने घेतली काळजी