आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. लहान घरापासून आलिशान बंगल्यात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाला आहे. काही जण कोकणातील गावी गणेशोत्सवाला गेले आहेत. तर काहीजण हमखास अष्टविनायकाची यात्रा करुन बाप्पाची भक्ती करतात. मराठमोळे अभिनेते आदेश बांदेकर यांनी अष्टविनायक यात्रेतील रांजणगावच्या बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला आहे. वाचून तुम्हीही चकीत व्हाल.
रांजणगावच्या यात्रेत अपघात घडला अन्..
आदेश बांदेकर यांनी मटाला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सर्वांसोबत शेअर केला. आदेश बांदेकर म्हणाले, रांजणगावच्या गणपतीची मोठी यात्रा होती. पण या यात्रेत एका कारचा भीषण अपघात झाला. सर्वजण घाबरले कारण त्या कारमध्ये लहान बाळ होतं. त्या गाडीतील बाळ थोडं जखमी झालं परंतु बाप्पाच्या कृपेने सुखरुप होतं. त्या कुटुंबाने ही तर बाप्पाची कृपा असं म्हणत रांजणगावच्या बाप्पाचे मनोमन आभार मानले. लोकांची देवावर किती श्रद्धा असते आणि देव लोकांच्या हाकेला कसा धावून येतो, याचं उदाहरण आदेश बांदेकरांनी सांगितलं.
आदेश बांदेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते गेली अनेक वर्ष 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत होते. काही महिन्यांपूर्वी या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या आदेश बांदेकर स्टार प्रवाहवरीर गणपती विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. इतकंच नव्हे काही दिवसांपूर्वी जी आषाढी वारी झाली, त्यासंदर्भातील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केलं.