Join us  

राजकारण नाही तर ही गोष्ट आहे डॉ. अमोल कोल्हे यांचं पहिलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 6:00 AM

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका निभावल्यानंतर अभिनेता अमोल कोल्हे हे आता नव्या भूमिकेत पदार्पण करत आहेत

ठळक मुद्देअमोल हे नेता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत दिसत आहेत

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका निभावल्यानंतर अभिनेता अमोल कोल्हे हे आता नव्या भूमिकेत पदार्पण करत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बाजी मारल्याने अभिनेता अमोल कोल्हे हे आता एका नेत्याच्या भूमिकेत सज्ज झाले आहेत. राजकीय यश पटकावल्यामुळे आता अमोल अभिनय सोडणार कि काय अशी चर्चा गेली अनेक दिवस सुरु आहे. पण त्यावर वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी 'अभिनय करणं थांबवणार नाही' हे स्पष्ट केलं. स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सुरु असल्यामुळे अमोल हे नेता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत दिसत आहेत.

याविषयी सविस्तर बोलताना अमोल म्हणाले, "मला माझ्या मतदार संघाला वेळ द्यायचा आहे. मालिका विश्वात दररोज बारा ते तेरा तास चित्रीकरण सुरु असतं. खासदार म्हणून आपल्या कर्तव्यांची पूर्तता योग्यरीत्या करता यावी म्हणून स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका पूर्ण झाल्यावर मालिका विश्वातून मी काही काळ बाजूला होणार आहे.  अर्थात, असं असलं तरी अभिनय सोडणार नाही. महाराजांची व्यक्तिरेखा, त्यांचे विचार मला अभिनयातून जागतिक पातळीवर घेऊन जायचे आहेत. चित्रपट, लघुपट, माहितीपट आदींच्या माध्यमातून इतिहासाची अनेक पानं मला उलगडायची आहेत."

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेस्वराज्य रक्षक संभाजी