Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रवाहच्या कलाकारांनी गायलेली आरती सोशल मीडियावर हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 10:12 IST

स्टार प्रवाहच्या कलाकारांनी गायलेली आरती सध्या सोशल मीडियावर चांगलीच हिट होत आहे. या आरतीत समीर परांजपे, रुपल नंद, उपेंद्र लिमये, प्रसिद्धी किशोर, हर्षदा खानविलकर, सुपर्णा श्याम, संकेत पाठक, नेहा पवार, रश्मी अनपट, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, प्रसाद जवादे, संग्राम साळवी, आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे हे कलाकार दिसत आहेत.

सध्या घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले आहेत. घरचे सर्व एकत्र येऊन बाप्पांची उत्साहाने आरती करत आहेत. स्टार प्रवाह परिवारातील सेलिब्रेटी सदस्यांनी देखील एकत्र येऊन नुकतीच एक आरती नव्या ढंगात सादर केली. या सेलिब्रेटींनी एकत्र येऊन केलेल्या विठुमाऊलीच्या आरतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमित्त आहे आगामी 'विठुमाऊली' या नव्या मालिकेचे!स्टार प्रवाह या वाहिनीवर लवकरच 'विठूमाऊली' ही नवी मालिका येत आहे. या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहने नुकतीच विठुमाऊलीच्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रवाह परिवाराचे समीर परांजपे, रुपल नंद, उपेंद्र लिमये, प्रसिद्धी किशोर, हर्षदा खानविलकर, सुपर्णा श्याम, संकेत पाठक, नेहा पवार, रश्मी अनपट, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, प्रसाद जवादे, संग्राम साळवी या सदस्यांनी एकत्र येत विठूमाऊलीची आरती केली. कोठारे व्हिजनचे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांचा सुद्धा यात सहभाग होता. 'येई हो विठ्ठले माझे माऊली ये' ही पारंपरिक आरती नव्या ढंगात सादर करण्यात आली आहे. संगीतकार सुयोग चुरी यांनी ही आरती संगीतबद्ध केली आहे. राजेश बिडवे यांनी नृत्यदिग्दर्शन, विनायक जाधव यांनी छायांकन, आलाप मोहिले यांनी सहदिग्दर्शन आणि शिल्पेश कोठारे यांनी दिग्दर्शन केले आहे. गौरव बुरसे, करण कागळे, पल्लवी केळकर आणि मीरा भालेराव यांना ही आरती गायली आहे.सध्या ही आरती घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गाजत आहे. सोशल मीडियात ही आरती पोस्ट केल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रात 'विठुमाऊली' या मालिकेविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचे या प्रतिसादावरून दिसून येत आहे.