मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिसत होती. मात्र अचानक तिने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. दुसरीकडे तेजश्री 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमातही झळकली. मात्र तेजश्री हिंदीत फारशी दिसत नाही. तिने स्वत:ला मराठीपुरतं सीमित ठेवलं आहे का असा प्रश्न तिला विचारला असता तिने काय उत्तर दिलं वाचा.
'मुक्काम पोस्ट मनोरंजन'ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "माझ्या घरात अवॉर्ड्स ठेवलेल्या शेल्फमध्ये एक जागा रिकामी आहे. तिथे एक लाईट लावला आहे. जेव्हा मला अवॉर्ड मिळतो मी ते तिथे ठेवते तेव्हा मला ती रिकामी जागा दिसते. ती जागा मला सांगते की अजून खूप काही बाकी आहे. मी प्रत्येक वेळी ती जागा तशीच रिकामी ठेवते. देव करो कधीतरी आयुष्यात मला ऑस्कर मिळो. पण कदाचित तो ऑस्करही मी त्या रिकाम्या जागेत ठेवू शकणार नाही. कारण तुम्ही अर्धवट राहता किंवा काहीतरी बाकी आहे असं वाटतं तेव्हाच तुम्ही रोज उठता आणि काम करता. आपण परफेक्ट आहोत हेच मानलं तर मग पुढे प्रगतीला काही स्कोपच राहत नाही."
हिंदीत काम करण्याविषयी तेजश्री म्हणाली, "मी स्वत:ला मराठीपुरतं सीमित ठेवलेलं नाही. मी २ हिंदी सिनेमे केले ज्यात मी मुख्य अभिनेत्री आहे. मी एक हिंदी नाटकही केलं. मी सीमित ठेवलेलं नाही फक्त काही सीमारेषा आखलेल्या आहेत. त्याच्यापलीकडे जाऊन काम करावंसं वाटत नाही. जे माध्यम आपल्याला बोलवतं त्याकडे कधीच पाठ फिरवायची नाही असं मला वाटतं. जेव्हा मला हिंदीतून चांगली संधी येईल तेव्हा मी तेही करेल."
तेजश्री या वर्षी काही चांगल्या प्रोजेक्ट्समध्येही दिसणार आहे. याबद्दल तिने अधिक माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच ती वेगळ्या भूमिकेत दिसेल असा तिने मुलाखतीत खुलासा केला आहे.