Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कितीही चांगलं काम केलं तरी सगळा फॉलोअर्सचा गेम..." अभिनेत्री सुरभी भावेने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:11 IST

मराठी अभिनेत्री सुरभी भावे एक खंत व्यक्त केली.

सुरभी भावे (Surabhi Bave) ही मराठी अभिनेत्री आहे. 'स्वामिनी' या कलर्स मराठीवरील मालिकेमुळे सुरभी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील ऐतिहासिक भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.  सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. नुकतंच सुरभीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

सुरभी भावेने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. सुरभीने लिहलं,  "एक खंत व्यक्त करणार आहे. कितीही चांगलं काम केलं तरी प्रसिद्धी काही ठराविक चेहऱ्यांनाच मिळते की तिथेही सगळा फॉलोअर्सचाच गेम असतो?" असं म्हटलं आहे. सुरभीशिवाय अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्याने भूमिका हातून निसटल्याचं सांगितलं. तसेच फॉलोअर्स पाहून एखाद्या भूमिकेसाठी निवड केली जाते, याबद्दलही खुलासा केलाय. 

सोशल मीडियाचा वापर आता सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असले की थेट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका मिळण्यापर्यंतचा प्रवास सुरु झाला आहे. ही बाब अनेकदा कलाकार मंडळींना खटकली आहे. यावरुन बऱ्याच कलाकारांनी भाष्यही केलं आहे. 

सुरभी सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत नकारात्मक भूमिकेमध्ये काम करतेय. ती अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे आणि अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'तुला पाहते रे', 'सख्या रे', 'गोठ', 'डॉ बाबासाहेब आंबेडकर', 'अस्मिता', 'माझे पती सौभाग्यवती', 'चित्रगथी', 'क्राईम डायरी' आणि 'चंद्र आहे साक्षीला' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. शिवाय,  'पावनखिंड' या चित्रपटात मातोश्री सोनाई देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया