Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील अम्माच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, दिसायला आहे लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 11:37 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील गौरीची लाडकी अम्मा घराघरात पोहोचली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta)मधील गौरीची लाडकी अम्मा घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत अम्माची भूमिका अभिनेत्री आशा ज्ञाते (Aasha Dnyate) यांनी साकारली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, आशा ज्ञाते यांची लेकदेखील अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

मूळच्या नाशिकच्या असलेल्या आशा ज्ञाते या खूप वर्षांपूर्वी मुंबईत आल्या आणि काही काळ नोकरी करू लागल्या. वयाच्या ३२ व्या वर्षी कामगार कल्याण केंद्रच्या जाणीव या नाटकातून त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. या नाटकातील सासूबाईंच्या भूमिकेला त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देखील मिळाले होते. गेल्या २२ वर्षांपासून त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मी रेवती देशपांडे, यदा कदाचित, आम्ही पाचपुते, जागो मोह प्यारे, सौजन्याची ऐशी तैशी, गोठ, लक्ष्य, राजा शिवछत्रपती, स्वामी समर्थ, आमचं सगळं सात मजली, नटसम्राट, अवघाची हा संसार, या सुखांनो या, माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा नाटक आणि मालिकेतून काम केले आहे.

साधारण २०१८ साली त्यांनी आपल्या वयाच्या ५६ व्या वर्षी नाट्यशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली आहे हे विशेष. शास्त्रीय संगीताचे शिक्षणही त्यांनी घेतले असून विविध संगीत नाटकातून त्यांनी आपली कला जोपासली आहे. कर्नाटकी भाषेत बोलणारी ही अम्मा प्रेक्षकांना खूप भावते आहे. आशा ज्ञाते यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रेश्मा आणि रिमा या त्यांच्या मुली आहेत यातील रेश्मा ज्ञाते ही अभिनेत्री तर आहेच शिवाय रेडिओ जॉकी म्हणूनही तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आरजे रेश्मा या नावाने रेनबो एफएमसाठी रेडिओजॉकी बनून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आता रेश्मा अभिनय क्षेत्रात देखील दाखल झाली आहे. अमृत अनुभव या शॉर्टफिल्ममध्ये रेश्माला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. रेश्मा सोबत मौमिता गोस्वामी ही देखील या शॉर्टफिल्ममध्ये महत्वाची भूमिका निभावणार आहे. इंद्रनील नुकटे यांनी या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले असून कथालेखन मौमिता गोस्वामी हिने निभावले आहे. मॅक्स प्लेअरवर ही शॉर्टफिल्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह