Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावेचा रुपेरी पडद्यावरचा झंझावात सुरूच, 'काही क्षण प्रेमाचे' हा ६२वा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 08:00 IST

ह्या चित्रपटात सुबोध-भार्गवीसोबत विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, ड. प्रशांत भेलांडे, जोती निसाळ, डॉ. विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटील , नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ज्योती प्रकाश फिल्म्स निर्मितीसंस्थेअंतर्गत हरिश्चंद्र गुप्ता निर्मित आणि डॉ. राज माने लिखित आणि दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेतून सध्या सर्वांचा लाडका झालेला सुबोध भावे ह्या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तर भार्गवी चिरमुले नायिकेच्या भूमिकेत आहे. संक्रांतीचे औचित्य साधून नुकतचं ह्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. तसेच चित्रपटाच्या पोस्टरवरुन चित्रपटाची उत्सुकता अजूनच शिगेला पोहोचली आहे.

केवळ तरुणींनाच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने वेडं लावलेल्या सुबोधचा ‘काही क्षण प्रेमाचे’ हा तब्बल ६२ वा चित्रपट आहे. २०१८ हे वर्ष सुबोधसाठी हॅपनिंग होते. सुबोधने पुष्पक विमान, सविता दामोदर परांजपे, शुभ लग्न सावधान, माझा अगडबंम आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सारख्या दर्जेदार चित्रपटात काम करुन आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले. तसेच बालगंधर्व, लोकमान्य.. एक युगपुरुष आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारखे बायोपिक करुन सुबोध बायोपिकचा बादशहाच झाला. मात्र सुबोध काही क्षण प्रेमाचे ह्या सिनेमातून एक परिपक्व प्रेमकथा घेऊन येत आहे. नात्यांमधली परिपक्वता आणि आपल्या जोडीदारासाठी केललं बलिदान ह्या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

‘काही क्षण प्रेमाचे’ ही कथा आहे अशा एका सामान्य माणसाची जो आपल्या कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतो. अशा वेळी आपल्या कुटुंबियांसोबत ''प्रेमाचे'' दोन शब्द बोलण्याकरताही त्याच्याकडे वेळ नसतो. त्याचवेळी अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठं वादळं येते ज्याने त्याचे संपुर्ण आयुष्य बदलून जाते. त्यातून तो आणि त्याचे कुटूंब कसा मार्ग काढणार तो प्रवास ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.

ह्या चित्रपटात सुबोध-भार्गवीसोबत विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, ड. प्रशांत भेलांडे, जोती निसाळ, डॉ. विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटील , नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच ऋषी लोकरे, हंसिका माने, काव्या पाटील, शिवम यादव यात बालकलाकार म्हणून दिसणार आहेत. हरिश्चंद्र गुप्ता यांचे चिरंजीव कबीर गुप्ता हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकर यांनी केले आहे. अशोक पत्की ह्या चित्रपटाचे संगीतकार असून खुद्द सुरेश वाडकर, देवकी पंडित, श्रद्धा वानखेडे, शेफाली यांनी यातील काही गाणी स्वरबद्ध केली आहे. तर प्रवीण दवणे आणि राज माने ह्या गाण्याचे गीतकार आहेत. 

टॅग्स :सुबोध भावे