Join us

आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:33 IST

Stuntman SM Raju Death: स्टंटमॅन राजू उर्फ मोहनराज एक SUV कार चालवत होते. जी एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन पलटली.

साऊथ सिनेमा इंडस्ट्रीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिग्दर्शक पा.रंजित आणि अभिनेता आर्या यांच्या आगामी सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. या सेटवर कारचा स्टंट करताना प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट राजू(मोहनराज) याचा मृत्यू झाला आहे. साऊथ अभिनेता विशालने सोशल मिडिया पोस्ट करत स्टंटमॅन राजूच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. राजूच्या निधनावर त्याने शोक व्यक्त केला आहे. 

कशी घडली दुर्घटना?

डायरेक्टर पा. रंजित, नागपट्टिनम येथे आगामी सिनेमा वेट्टूवम याचे शुटींग करत होते. त्याचवेळी स्टंट करताना सेटवर मोठी दुर्घटना घडली. ज्यात स्टंटमॅनचा जीव गेला. सुरुवातीला स्टंटमॅनला हार्टअटॅक आल्याचे समोर आले परंतु आता सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक धोकादायक स्टंट करताना अपघात घडल्याचे दिसून येत आहे. 

स्टंटमॅन राजू उर्फ मोहनराज एक SUV कार चालवत होते. जी एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन पलटली. त्यानंतर त्यांची कार खाली कोसळली आणि पुढील भाग जमिनीवर आदळला. या व्हिडिओत राजूला कारमधून बाहेर काढताना दिसत आहे. ही दुर्घटना १३ जुलैला झाली. या अपघातात स्टंटमॅन राजूचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तामिळ अभिनेता विशालने यावर पोस्ट करून राजूच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखत होतो. त्यांनी माझ्या अनेक सिनेमात धोकादायक स्टंट केले होते. ते खूप धाडसी व्यक्ती होते असं त्यांनी म्हटलं. 

कोण होते स्टंटमॅन राजू?

स्टंटमॅन राजू विषयी बोलायचे झाले तर ते कॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध, अनुभवी आणि धाडसी स्टंट आर्टिस्ट होते. एखादा जोखमीचा स्टंट ते धाडसाने करायचे. अनेक वर्षापासून ते इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांच्या टॅलेंटचे अनेकांनी कौतुक केले. राजू त्यांच्या कामात खूप प्रामाणिक होते. मात्र नियतीने स्टंट करतानाच त्यांचे प्राण घेतले. १३ जुलैला घडलेला हा अपघात इतका भयंकर होता की राजू यांचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :स्टंटमॅनमृत्यूव्हायरल व्हिडिओसोशल व्हायरल