बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांची बॉडी, त्यांचं मानधन आणि फॅशन याची नेहमीच चर्चा असते. कलाकारांची जीवनशैलीही सामान्यांपेक्षा वेगळी असते. अनेक सेलिब्रिटींनी तर बोटॉक्स, फिलर्सही केलं आहे. मात्र साऊथमध्ये एक असा कलाकार आहे जो अगदीच सामान्य आहे. त्याचे ना सिक्स पॅक अॅब्स आहेत ना ही महागडे स्टायलिश कपडे. तरी त्याने नुकतेच दोन ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. यामुळे त्याचं मानधनही कमालीचं वाढलं आहे. कोण आहे हा अभिनेता?
हा अभिनेता आहे प्रदीप रंगनाथन (Pradeep Ranganathan). प्रदीप तमिळ दिग्दर्शक , लेखक आणि अभिनेताही आहे. २०१९ साली त्याचा 'कोमाली' हा सिनेमा आला जो सुपरहिट झाला. हा त्याचा पहिलाच सिनेमा. यामध्ये रवि मोहन आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. २०२१ मध्ये प्रदीपला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी SIIMA पुरस्कार मिळाला. १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने ५१ कोटींची कमाई केली होती.
२०२२ साली त्याचा 'लव टुडे' आला. प्रदीपने या रोमँटिक सिनेमात फक्त काम केलं नाही तर याचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं. ६ कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने देशात ६६.५७ कोटींची कमाई केली. या सिनेमाच्या यशामुळे तो रातोरात स्टार झाला. याचाच हिंदी रिमेक 'लवयापा' आहे.
तर यावर्षी त्याचा 'ड्रॅगन' सिनेमा रिलीज झाला. प्रेमात अयशस्वी झालेल्या तरुणाची ही कथा आहे. ३५ कोटी बजेट असलेल्या या सिनेमाने ९८.७३ कोटींची कमाई केली. हा यंदाचा ब्लसॉकबस्टर तमिळ सिनेमा बनला. प्रदीपच्या करिअरचा चढता आलेख पाहता 'लव टूडे'साठी त्याला दीड कोटी मिळाले होते. तर ड्रॅगन साठी त्याला थेट १२ कोटी मानधन मिळालं.