सध्या भारतीय मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे ती म्हणजे 'पुष्पा 2'. हा सिनेमा पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये रात्रभर रांगा लावून सिनेमा पाहायला गेले. इतकंच नव्हे तर मुंबई आणि भारतातील अन्य काही भागांत 'पुष्पा 2'चे भल्या पहाटे शो आहेत. 'पुष्पा 2' संपल्यानंतर प्रेक्षकांना 'पुष्पा 3 The Rampage'ची घोषणा होताना दिसली. जेव्हा एक मुलगा उंच टेकडीवर उभा राहून हातातल्या रिमोटच्या साहाय्याने बॉम्बस्फोट करताना दिसतो. त्यामुळे 'पुष्पा 3 The Rampage'ची कथा काय असणार? याशिवाय पुष्पाच्या मुलाच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार, याची चर्चा सुरु झालीय.
काय असणार 'पुष्पा 3 The Rampage'ची कथा?
'पुष्पा 2'च्या शेवटी दाखवलं गेलंय की.. पुष्पा, श्रीवल्ली अन् संपूर्ण कुटुंब एका लग्नसोहळ्यात सहभागी होतं. परंतु त्यांच्या लग्नाच्या स्थळी मोठा स्फोट होतो. त्यानंतर एका टेकडीवर पुष्पाचा मुलगा हातात रिमोट घेऊन मोठा स्फोट घडवून आणतो. 'पुष्पा 3 The Rampage'मध्ये हीच कथा पुढे जाताना दिसणार आहे. लग्नस्थळी बॉम्बस्फोट झाल्याने पुष्पा आणि श्रीवल्ली वाचतात का? याचा अद्याप उलगडा झाला नाही. तरीही आई-वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने 'पुष्पा 3 The Rampage' मध्ये पुष्पाचा मुलगा बदला घेताना दिसणार आहे.
हा अभिनेता दिसणार पुष्पाच्या मुलाच्या भूमिकेत?
'पुष्पा 3 The Rampage'मध्ये श्रीवल्ली अन् पुष्पाचा मुलगा आता शत्रूंचा सामना करताना दिसणार आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार विजय देवराकोंडा अल्लू अर्जुनच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात अशीही शक्यता वर्तवली जातेय की, विजय हा 'पुष्पा 3 The Rampage'मध्ये मुख्य खलनायक म्हणून समोर येईल. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या मुलाच्या भूमिकेत वेगळा अभिनेता दिसण्याचीही शक्यता आहे. आता 'पुष्पा 3 The Rampage' जेव्हा रिलीज होईल, तेव्हाच प्रेक्षकांना याबद्दल कळेल. दरम्यान ' 'पुष्पा 2' मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दीत सुरु आहे.