Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजामौलींनी हैदराबादमध्ये उभारलंय अख्खं वाराणसी, इतका भव्य सेट की 'बाहुबली'ही फिक्का वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:52 IST

'बाहुबली'चाही विसर पडेल! राजामौलींच्या सेटची भव्यता पाहून थक्क व्हाल, संपूर्ण वाराणसी शहर हैदराबादमध्ये उभारलं जातंय

 सध्या भारतीय चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर जनरेटेड इमेजचा ट्रेंड वाढलाय. पण असेही काही दिग्दर्शक अजूनही आहेत, जे त्यांच्या चित्रपटांसाठी भव्य सेट उभारतात. या यादीत संजय लीला भन्साळी, मणिरत्नम आणि एस. एस. राजामौली यांचं नाव येतं. या तिन्ही दिग्दर्शकाच्या चित्रपटांमध्ये शाही थाट, आकर्षक मांडणी, भव्यदिव्य सेट पाहायला मिळतात.  सिनेमात भव्यता आणण्यासाठी हे दिग्दर्शक ओळखले जातात.  'बाहुबली'सारख्या भव्य सिनेमाच्या सेटमुळे प्रसिद्ध असलेले एस. एस. राजामौली पुन्हा एकदा प्रेक्षकांना अचंबित करणार आहेत. यावेळी त्यांनी जो सेट उभारला आहे, तो पाहून तुम्हाला 'बाहुबली'चाही विसर पडेल. सोशल मीडियावर या सेटचे फोटो झपाट्याने व्हायरल होत असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हैदराबादमध्ये एक नवीन सेट उभारला जात आहे. ज्यावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. राजामौली यांनी त्याच्या 'एसएसएमबी२९' चित्रपटासाठी हैदराबादमध्येच 'वाराणसी' बसवलंय. ज्यामध्ये घाट आणि मंदिरे उभारली आहेत. सिनेमातील बराच भाग हा वाराणसीवर क्रेंद्रीत असल्यानंं हा सेट उभारला जात असल्याची माहिती आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, हा सेट हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये तयार केला जात आहे. हा सेट पडद्यावर खऱ्या शहरासारखा दिसावा, अशी राजमौली यांची इच्छा आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात महागडा सेट आहे. या सेटची किंमत संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त आहे. देवदास हा भारतातील महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी खूप महागडा सेट बांधला होता. 

राजमौली यांच्या या बहुचर्चित चित्रपटात प्रियंका चोप्रा, महेश बाबूसारखे सुपरस्टार आहेत. या चित्रपटाचे दोन शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच या सिनेमाचं काही शुटिंग ओडिशामध्ये झालं होतं. तेव्हा प्रियंका चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आली होती. आता पुढील शेड्यूल केनियामध्ये शूट केले जाणार आहे. यापूर्वी एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सारखे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यालाही ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

टॅग्स :एस.एस. राजमौलीसेलिब्रिटीप्रियंका चोप्रामहेश बाबू