'पुष्पा 2' आज जगभरात रिलीज झालाय. पण सिनेमा रिलीज होताच मोठं गालबोट लागलंय. काल 'पुष्पा 2'चा प्रिमियर झाला. त्यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीचं नियंत्रण सुटलं. चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा यात मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. अल्लू अर्जुन आणि इतर टीम हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये प्रिमियरसाठी येणार असताना ही दुर्घटना घडली. (pushpa 2 premiere stamped)
नेमकी घटना काय?
दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुलं श्रीतेज (९) आणि संविका (७) यांच्यासोबत 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला उपस्थित होती. प्रिमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं.
रेवती यांचा मुलगा श्रीतेज गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी बेगमपेट येथील केआईएमएस हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. सध्या श्रीतेजची प्रकृती स्थिर आहे. संध्या थिएटरबाहेर 'पुष्पा 2'च्या प्रिमियरसाठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन ही मोठी दुर्घटना झाली. सर्वजण या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान आज 'पुष्पा 2' जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झालाय.