Join us  

साऊथच्या 'हनुमान' सिनेमातील VFX पाहून नेटकरी थक्क, 'आदिपुरुष'शी केली तुलना, म्हणाले, "ओम राऊतने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 1:16 PM

"३० कोटींमध्येही VFX..." , 'हनुमान' सिनेमा पाहून नेटकऱ्यांनी 'आदिपुरष'ला पुन्हा केलं ट्रोल

बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत सध्या 'हनुमान' या साऊथ सिनेमाची चर्चा रंगली आहे. प्रशांत वर्मा यांचं दिग्दर्शन असलेला 'हनुमान' सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. भगवान 'हनुमान' यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमातील व्हीएफएक्स पाहून नेटकऱ्यांना ओम राऊतचा 'आदिपुरुष' सिनेमा आठवला आहे. 'हनुमान' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा 'आदिपुरुष'ला ट्रोल केलं आहे. 

२०२३मध्ये प्रदर्शित झालेला 'आदिपुरुष' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाला संवाद आणि व्हीएफएक्समुळे ट्रोल करण्यात आलं होतं. सिनेमाला होणार विरोध आणि टीकेमुळे 'आदिपुरुष'मधील व्हीएफएक्स आणि संवाद बदलण्यात आले होते. ४०० कोटींचं बजेट असलेल्या 'आदिपुरुष'मधील व्हीएफएक्सची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. आता 'हनुमान' सिनेमातील व्हीएफएक्सची तुलना नेटकऱ्यांनी 'आदिपुरुष'च्या व्हीएफएक्सबरोबर केली आहे. 

'हनुमान' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर 'आदिपुरुष'ला पुन्हा ट्रोल केलं आहे. ३० कोटींचं बजेट असलेल्या 'हनुमान' सिनेमातील व्हीएफएक्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. एकाने ट्वीट करत "जेव्हा तुमच्याकडे चांगले चित्रपट बनवण्याची संधी असते तेव्हा 'हनुमान'सारखे सिनेमे बनवा...'आदिपुरुष'सारखे नाही...", असं म्हटलं आहे. 

तर दुसऱ्याने "ओम राऊत हनुमान बघ. भावनात्मक विषय कसे हाताळायचे हे साऊथ दिग्दर्शकांनी पुन्हा सिद्ध केलं आहे," असं ट्वीट केलं आहे. 

"हनुमान पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो तो म्हणजे आदिपुरुषचं खरंच ४०० कोटींचं बजेट होतं का? की ४ कोटींचं होतं?", असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. 

एकाने ट्वीटमध्ये म्हटलं की, "ब्रह्मास्त्र, आदिपुरुषने मोठी संधी घालवली. प्रशांत वर्मासारख्या दिग्दर्शकांना ही संधी मिळायला हवी होती. ३० कोटींपेक्षा कमी बजेट असूनही चांगले व्हीएफएक्स करता येतात."

'हनुमान' हा एक तेलुगु सिनेमा आहे. शुक्रवारी(१२ जानेवारी) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात तेजा सज्जा, अमृता अय्यर, दीपक शेट्टी, विनय राय अशी स्टारकास्ट आहे. 'हनुमान'मधील तेजा सज्जाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :Tollywoodआदिपुरूषसिनेमा