Join us  

संगीतकार इलैयाराजा यांची लेक गायिका भवतारिणीचं निधन, कमल हसन यांची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 1:33 PM

वयाच्या 47 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतदिग्दर्शक इलैयाराजा (Ilaiyaraaja) यांची मुलगी भवतारिणी (Bhavatharini) हिचे काल निधन झाले. वयाच्या 47 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. श्रीलंकेत लीव्हर कॅन्सरवर उपचार सुरु असतानाच तिचे प्राण गेले. आपल्या भावपूर्ण गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भवतारिणी गंभीर आजाराशी सामना करत होती. काल संध्याकाळी 5 वाजता तिने शेवटचा श्वास घेतला. आज त्यांचे पार्थिव चेन्नईत परत आणण्यात येईल आणि नंतर अंत्यसंस्कार केले जातील अशी शक्यता आहे.

इलैयाराजा यांचे मित्र अभिनेते भारतीराजा यांनी ट्विटरवर लिहिले,'मी माझ्या प्रिय मित्राचं कसं सांत्वन करु. भवतारिणीच्या निधनाने आमचं कुटुंब हळहळलं आहे.' तर प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते लिहितात, 'मी सुन्न झालो आहे. मला कळत नाही मी माझा जवळचा मित्र इलैयाराजाला काय बोलू. मी मनातूनच त्याचा हात पकडला. भवतारिणीचं निधन चटका लावून गेलं आहे. इलैयाराजा तू निराश होऊ नकोस. भवतारिणीच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.'

भवतारिणी यांनी 'रसैय्या'मधून संगीत क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. तमिळ सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या सुमधूर आवाजात गाणी गायली. तसंच वडील इलैयाराजा, भाऊ कार्तिक राजा आणि युवान शंकर राजा या संगीतकारांसाठीही त्यांनी गाणी गायली. देवा आणि सिरपी यांच्या रचनेतही त्यांनी गायलं. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 2002 मध्ये रेवती यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'मित्र, माय फ्रेंड' आणि नंतर 'फिर मिलेंगे' सारख्या सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. मल्याळम सिनेमा 'मायानाधि' मध्ये त्यांनी शेवटचं गाणं गायलं होतं. 

टॅग्स :कमल हासनTollywoodकेरळसंगीत