Join us  

प्रसिद्ध अभिनेत्याचं अपघाती निधन; ७ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर मालवली प्राणज्योत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 1:23 PM

Sujith rajendran: अलुवा-परवुर रोडवरील अल्वे सेंटलमेंट उच्च माध्यमिक शाळेसमोर त्याचा गंभीर अपघात झाला होता.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुजीत राजेंद्रन (Sujith rajendran) याचं अपघाती निधन झालं आहे.  सुजीतने अनेक गाजलेल्या मल्याळम सिनेमात काम केलं होतं. इतकंच नाही तर अभिनेत्री सनी लिओनीसोबतही त्याने स्क्रीन शेअर केली होती. मात्र, त्याचं अचानक झालेल्या निधनामुळे कलाविश्वासह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ९ एप्रिल रोजी सुजीतने अखेरचा श्वास घेतला. केरळमधील एर्नाकुलम येथील अलुवा-परवुर रोडवरील अल्वे सेंटलमेंट उच्च माध्यमिक शाळेसमोर त्याचा गंभीर अपघात झाला. या अपघातानंतर त्याच्यावर जवळपास आठवडाभर उपचार सुरु होते. मात्र, त्याची मृत्युशी दिलेली झुंज अपयशी ठरली आणि अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

सुजीतने २०१८ मध्ये सुगीथ यांच्या किनवल्ली या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो मॅरेथॉन, रंगीला यांसारख्या सिनेमात झळकला.उत्तम अभिनेता असण्यासोबतच सुजीत एक डान्सरही होता. शास्त्रीय नृत्याचं त्याने प्रशिक्षण घेतलं होतं. विशेष म्हणजे विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा सुजीत अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जात होता.

दरम्यान, कलाविश्वात येण्यापूर्वी सुजीत दुबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. मात्र, त्याच्यातील अभिनेता त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्याने मोठ्या पगाराची नोकरी सोडून थेट कलाविश्वात नशीब आजमावलं होतं.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकार