मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्नाने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. ती फक्त ३० वर्षांची होती. शोभिताने आत्महत्या केल्याचं समजताच तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय. शोभिता ही साऊथ चित्रपट आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शोभिताने अचानक स्वतःचं आयुष्य का संपवलं, याचं कारण अद्याप समोर आलं नाहीय. दरम्यान पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
शोभिताने ३० व्या वर्षी संपवलं आयुष्य
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना हैदराबाद येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. ३० नोव्हेंबरला रात्री शोभिताने तिचं आयुष्य संपवलं. अभिनेत्रीने अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचललं याविषयी पोलीस तपास करत आहेत. शोभिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय. रिपोर्टनुसार बंगळुरु येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शोभिताचं फिल्मी करिअर
शोभिता ही कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथे राहते. गेल्या दोन वर्षांपासून शोभिताचं हैदराबाद येथे वास्तव्य होतं. शोभिताने 'मंगला गौरी’, ‘गलीपाटा’, 'कृष्णा रुक्मिणी’, ‘कोगिले’ यांसारख्या १० लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय. याशिवाय 'एराडोंडला मुरु', 'जॅकपॉट' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये शोभिता झळकली आहे. १६ नोव्हेंबरला शोभिताने शेवटची इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली होती. यात गिटार वाजवणाऱ्या एका गायकाचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. शोभिताच्या दुर्दैवी मृत्युमुळे तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय.