मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुमी हार चौधरी १४ जुलै रोजी रस्त्यावर विचलित आणि मानसिकदृष्टीने अस्थिर अवस्थेत आढळून आली. अमिला बाजारपेठेजवळ एका गावात स्थानिकांनी तिला रस्त्याच्या कडेला बसलेलं पाहिलं आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुमीची विचारपूस केली असता तिने स्वतःची ओळख सांगितली. मी अभिनेत्री आहे असं ती सर्वांना सांगत होती, मात्र तिचं बोलणं समोरच्याला गोंधळात टाकणारं होतं.
अभिनेत्रीला वेड लागलं?
सुमी ज्या ठिकाणी सापडली तेव्हा तिच्या हातात काही कागदपत्रं आणि पेन होतं, पण तिची अवस्था अत्यंत गोंधळलेली होती. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणाहून सुमीला सुरक्षित ठिकाणी एका स्थानिक आश्रयगृहात हलवलं. पुढे सुमीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार सुमीची मानसिक अवस्था अत्यंत वाईट असून तिला सध्या योग्य उपचारांची गरज आहे. सुमीने अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केलंय. 'खासी कथा: अ गोट सागा’ या सिनेमात सुमीने नसीरुद्दीन शाह यांच्यासह काम केलंय.
बर्दवान येथील पोलिसांनी सांगितलं की, सुमीचा राहण्याचा पत्ता अथवा कुटुंबीयांची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबाचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून सोशल मीडियाच्या आधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुमी हार चौधरी ही प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. काही वर्षांपूर्वी बंगाली चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती मनोरंजन क्षेत्रातून दूर आहेत. सुमी अशा अवस्थेत सापडल्याने चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात खळबळ माजली आहे. पोलिस आणि सामाजिक संस्थांनी सुमीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.