Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) लवकरच 'पुष्पा 2: द रुल' मधून धमाका करणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. कालच सिनेमाची टीम मुंबईत आली होती. इथेही जोरदार प्रमोशन झालं. यावेळी अल्लू अर्जुनने थेट मराठीत संवाद साधत महाराष्ट्रातील चाहत्यांची मनं जिकंली.
'पुष्पा 2' च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन स्टेजवर येताच हाती माईक घेतो आणि सर्वांना "नमस्कार" असं बोलून अभिवादन करतो. "नमस्कार" बोलून झाल्यानंतर "कसं काय मुंबईकर" असं अल्लू अर्जुन म्हणतो. त्याच्या तोंडून मराठी ऐकताच शिट्या आणि टाळ्याचा कडकडाट झाला. अल्लू अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. त्याचा हा मराठमोळा ठसका पाहून त्याचे मराठी चाहते खूश झाले आहेत.
https://www.instagram.com/p/DC_2aWUtvNM/?img_index=1
दरम्यान, अल्लू अर्जुनने मराठीत बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी तीन वर्षांपूर्वी ‘पुष्पा’च्या पहिल्या भागावेळी अल्लू अर्जुन मुंबईत आला होता, तेव्हा त्याने सर्वांशी मराठीत संवाद साधत "नमस्कार" असं मराठीत म्हटलं होतं. दरम्यान, ''पुष्पा' सिनेमाच्या पहिल्या भागात मराठी शब्द ऐकायला मिळाले होते. तर दुसऱ्या भागातही मराठी भाषेचा टच असणार आहे. कारण, हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.