Join us  

अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्यासोबत मुलगी अरहाने दिली 'पुष्पा'ची सिग्नेचर पोज, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:06 PM

दुबईच्या मादाम तुसां संग्रहालयात अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

अल्लू अर्जुन हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. पुष्पा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या या अभिनेत्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुन फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. नुकतेच त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जूनच्या मुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

अल्लू अर्जुनने 28 मार्च रोजी दुबईच्या मादाम तुसां संग्रहालयातील त्याच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण केलं. लाल कोट, पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये अल्लूचा पुतळा तयार करण्यात आला आहे. हा पुतळा 'पुष्पा.. झुकेगा नहीं साला' स्टाईलमध्ये बनवण्यात आला आहे. अल्लू अर्जुनने जेव्हा मादाम तुसां संग्रहालयात त्याच्या पुतळ्याचं अनावरण केलं, तेव्हा त्याची मुलगी अरहा तिथे उपस्थित होती. पुतळ्याजवळ ती पुष्पा स्टाईलमध्ये उभी होती. आपल्या मुलीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'पुष्पा द राईज' मधला पुष्पाचा तो लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'पुष्पा: द राइज' १७ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'पुष्पा' सिनेमा पाहिलेला प्रत्येक जण  'पुष्पा: द रूल' या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीTollywoodमॅडम तुसाद संग्रहालय