बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. हा फोटो काहीसा भावूक करणारा आहे. पण सोनालीचा मॅसेज मात्र खूपच पॉझिटीव्ह आहे. या फोटोत सोनाली बॉल्ड लूकमध्ये दिसतेय. म्हणजे, तिने डोक्याचे मुंडण केले आहे. पण तिच्या चेहऱ्यावरची भलीमोठी स्माईल नवी उमेद देणारी आहे.
फोटोत सोनाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत आहे. यातील एक आहे, हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान. हा फोटो शेअर करत सोनाली लिहिते, ‘ ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे काहीशा विचित्र नजरेने बघतात. आयुष्याचा प्रत्येक क्षण मी मनमुराद जगते आणि प्रत्येक क्षण सेलिब्रेट करण्याची संधी शोधत असते. हो, सध्या मी वेदनेतून जातेय. पण आता मला जे आवडते, तेच मी करते, ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यासोबत वेळ घालवते. मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल, आभाऱ़़ ,’ असे सोनाली म्हणाली. ‘आजकाल मला तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. कारण केसांचे काहीही करावे लागत नाही,’असेही तिने लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी सोनालीने मुलगा रणवीरसोबतचा फोटो शेअर करत, एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. माझा १२ वर्षे ११ महिने आणि ८ दिवसांच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण त्याला वास्तव सांगणेही गरजेचे होते. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नव्हते. प्रत्येकवेळी आम्ही त्याच्याशी प्रामाणिक होतो. यावेळी आम्ही हाच निर्णय घेतला आणि सगळे वास्तव त्याच्यासमोर ठेवले. त्याने बातमी अतिशय संमजपणे घेतली. इतकेच नाही तर माझ्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनला/ आता अनेकदा तो माझ्या पालकाच्या भूमिकेत असतो, असे सोनालीने लिहिले होते.