काल रात्री रंगलेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या गर्दीत एक मराठमोळा चेहराही उठून दिसला. हा चेहरा कुणाचा तर मराठीचा दिग्गज अभिनेता व विनोदवीर सिद्धार्थ जाधव याचा. सिद्धार्थने अगदी सूटाबुटात डॅशिंग अंदाजात फिल्मफेअर पुरस्काराच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. त्याची पत्नी तृप्ती ही सुद्धा त्याच्यासोबत होती.
नेव्ही ब्लू जॅकेट, कोट, असा त्याचा अंदाज सगळ्यांनाच भावला. पुढे रणवीर सिंग आणि सारा अली खानसोबतची त्याची गळाभेटही लक्ष्यवेधी ठरली. सिद्धार्थ व रणवीर आमनेसामने आल्यावर दोघांनीही अगदी उत्स्फूर्तपणे एकमेकांना अलिंगन दिले.
सारा अली खानसोबत सिद्धार्थने सेल्फी घेतला. तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘सिम्बा’ या चित्रपटात सिद्धार्थ रणवीर व सारासोबत दिसला होता. या चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थची रणवीर व सारासोबत घट्ट मैत्री जुळली. फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान याच मैत्रीचे प्रदर्शन घडले. रणवीरने स्वत: पुढाकार घेत रणबीर कपूर, आलिया भट अशा सगळ्यांशी सिद्धार्थची ओळख करून दिली.