Join us  

शिवसेनेत फूट पडणार याची आदेश बांदेकरांना कल्पना होती?; सुचित्रा म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 2:25 PM

Suchitra Bandekar : सुचित्रा बांदेकर सध्या त्यांच्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत फूट पडली त्याबद्दल भाष्य केले आहे.

केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतल्या सहा प्रसिद्ध अभिनेत्री पहायला मिळणार आहेत. यात  सुकन्या कुलकर्णी (sukanya kulkarni-mone), वंदना गुप्ते(vandana gupte), सुचित्रा बांदेकर (suchitra bandekar), दीपा चौधरी (Deepa Chaudhari), रोहिनी हटट्ंगडी (Rohini Hattangadi) आणि शिल्पा नवलकर (shilpa navalkar) यांचा समावेश आहे. नुकतेच यातील सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांनी लोकमत पंचायतमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुचित्रा बांदेकर यांना शिवसेनेत फूट पडली त्याबद्दल भाष्य केले आहे.

सुचित्रा बांदेकर यांना लोकमत पंचायतमध्ये विचारण्यात आले की, तुमचे पती राजकारणात चांगलेच सक्रीय आहेत. जेव्हा शिवसेनेत दोन गट पडले. त्यावेळी तुमच्यात त्या गोष्टीवर चर्चा व्हायची का, त्यावर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, खरेतर सुरुवातीपासूनच आम्ही घरात राजकारण आणलं नाही. आदेश मनापासून त्या गोष्टी करतो. त्यातून एक पैशांचा स्वार्थ नाही किंवा सुरूवातीपासून कुठल्याही फायद्याची अपेक्षा नाही. त्यामुळे साधारण तो विषय होत नाही.  पण बऱ्याचदा असं होतं की जी बाजू सत्याची आहे, त्याच बाजूला आदेश उभा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांसोबतच आहोत आणि त्यांच्यासोबतच राहणार आहोत. कारण आम्हांला त्यांची बाजू जास्त पटते आहे.

महाराष्ट्रात राजकीय महिला आरक्षण आहे. स्थानिक स्वराज्यात महिलांना आरक्षण आहे. सरपंच आणि नगरसेविका म्हणून बऱ्याच महिला कार्यरत आहेत. पण ती महिला पदावर असली तरी तिचा कारभार तिचा नवरा किंवा मुलं पाहत असतात. महिलांना संधी दिली गेली तरी आजही पुरुष मक्तेदारी पाहायला मिळते. यावर तुमचे मत काय आहे? त्यावर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, बऱ्याच सिनेमात ही गोष्ट मांडण्यात आली आहे. पंचायत सारख्या वेबसीरिजमधून ही बाब छान मांडली आहे. मला स्वतःला असं वाटतं की हे प्रत्येक बाईने ठरवायला पाहिजे. खरंच माझा जो अधिकार आहे तो खरंच पुरुषाला द्यायचा का ? आज माझी ती ड्युटी आहे. तुम्ही मला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. तर लोकांना मी काम करणं अपेक्षित आहे. भावाला, मुलाला, नवऱ्याला अधिकार देऊन स्वतःचं स्वत्व घालवून बसतात. त्या पुढे म्हणाल्या की,बायकांनी खरंच स्वतःला दिलेलं काम केलं ना तर घोटाळे, भ्रष्टाचार आणि खोटारडेपणा संपेल. बायकांचा फोकस जे काम दिलंय त्यावर असतो.

सिनेइंडस्ट्रीत महिला निर्मात्या आहेत. ज्यात स्वतः सुचित्रा आहे पण तिच्या निर्णयात किंवा कामात आदेश बांदेकर ढवळाढवळ करत नाहीत. तसेच सुबोध भावेची पत्नी मंजिरी भावेदेखील निर्माती आहे. तिच्या कामातही सुबोध मध्यस्थी करत नाही. सर्व जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या. कोणताही निर्णय घेताना घाबरली नाही. तसे या बायकांनी सुद्धा स्वतःचं स्वतः लढायला पाहिजे, असे सुकन्या मोने म्हणाल्या.

टॅग्स :आदेश बांदेकरशिवसेनाउद्धव ठाकरेकेदार शिंदे