'रोडीज', 'बिग बॉस' अशा रिएलिटी शोमधून शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. शिवचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. शिव ठाकरे हा त्याच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावामुळे विशेष ओळखला जातो. अशाच एका व्हिडिओतून पुन्हा एकदा शिवच्या स्वभावाची झलक पाहायला मिळत आहे.
शिव ठाकरेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आजीची वेणी फणी करताना दिसत आहे. त्यानंतर आजीला कानातले घालत तिच्या कपाळावर टिकली लावत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आजीदेखील शिव ठाकरेवर मायेने हात फिरवत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर शिव आजीला घेऊन मंदिरात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. "दिन को रात कहेगी तो मैं रात कहूं, तेरा दिल दुखा दे जो ऐसी न बात करूं", असं कॅप्शन शिवने या व्हिडिओला दिलं आहे.
शिव ठाकरेने शेअर केलेल्या आजी-नातवाच्या या गोड व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओतून आजी आणि नातवामधलं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे. शिवच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे.