Join us
Daily Top 2Weekly Top 5

शंतनू मोघेचं सफरचंद नाटकात कमबॅक, प्रयोगादरम्यान झाला होता पाय फॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 19:46 IST

Shantanu Moghe : अभिनेता शंतनू मोघेचा धुळ्यामध्ये एका महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान त्याच्या पायाला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना एक महिना आराम करण्यास सांगितले होते.

सरगम प्लस अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या सफरचंद या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या मूळ ‘सफरजन’ नाटकाचे रूपांतर मराठीत मुग्धा गोडबोले यांनी “सफरचंद” या नावाने केले असून राजेश जोशी यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेगळा विषय या नाटकात मांडला असून सर्वधर्म समभाव हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एक भव्य दिव्य नाट्यनिर्मिती म्हणून या नाटकाने रंगभूमीवर कमाल केली आहे. हुबेहूब काश्मीर प्रत्यक्षात रंगमंचावर अवतरला असून फिरता रंगमंच, भव्य नेत्रसुखद नेपथ्य, त्या वातावरणाला साजेसं मधुर संगीत ही या नाटकाची उल्लेखनीय बाजू आहे. या नाटकातील उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेते शंतनू मोघे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून संजय जामखंडी, प्रमोद शेलार, अमीर तडवळकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या कलाकारांनीही चोख भूमिका साकारल्या आहेत. 

या नाटकातील मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता शंतनू मोघेचा धुळ्यामध्ये एका महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान त्याच्या पायाला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना एक महिना आराम करण्यास सांगितले. शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे अचानक आलेल्या या प्रसंगाशी हार न मानता व ३१ मार्चचा बोरिवली येथील पूर्वनियोजित प्रयोग रद्द न करता शंतनू मोघे यांनी वॉकरच्या सहाय्याने हा प्रयोग सादर केला. पायाला फ्रॅक्चर झालेलं असतानाही हातात वॉकर घेऊन त्यानं नाटकाचा संपूर्ण प्रयोग केला आणि प्रेक्षकांनीही या प्रयोगाला टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.

नंतर शंतनू मोघे यांच्या जागी दूसरा अभिनेता घेऊन या नाटकाचे प्रयोग निर्मात्यानी सुरू ठेवले. पण आता तब्बल एक महिन्यानंतर शंतनू मोघे पूर्णपणे बरा होऊन या नाटकात परतला आहे. या नाटकाचा पुढील प्रयोग १ मे रोजी दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर येथे होणार असून पुढील सर्व प्रयोगात शंतनू मोघे अभिनय करताना दिसणार आहे. 

टॅग्स :शंतून मोघे