आज ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (manoj kumar) यांचं निधन झालं. मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'भारतकुमार' म्हणून मनोज कुमार यांची इंडस्ट्रीत ओळख होती. मनोज यांनी अनेक देशभक्तीपर सिनेमे केले. त्यामुळे चाहत्यांमध्ये मनोज कुमार यांना आदराचं स्थान होतं. मनोज कुमार यांच्या आयुष्यात घडलेला असाच एक किस्सा. जेव्हा मनोज कुमार यांनी मोठ्या पडद्यावर भगत सिंग यांची भूमिका साकारली. त्यानंतर भगत सिंग यांची आई मनोज कुमार यांना काय म्हणाली? याचा भावुक किस्सा जाणून घ्या.
भगत सिंग यांची आई मनोज कुमार यांना काय म्हणाली
मनोज कुमार यांना भगत सिंग यांच्याविषयी खूप आदर होता. भगत सिंग यांचं आयुष्य मनोज कुमार यांना प्रेरणादायी वाटायचं. त्यामुळेच १९६५ साली मनोज कुमार यांनी शहीद हा सिनेमा बनवला. या सिनेमात मनोजकुमार यांनी शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली. या सिनेमानंतर सच्चा देशभक्त म्हणून मनोजकुमार यांना ओळख मिळाली. हा सिनेमा जेव्हा भगत सिंग यांच्या आईने पाहिला तेव्हा त्या खूप भावुक झाल्या. "तू अगदी माझ्या मुलासारखा दिसतोस", असं त्या सिनेमा पाहून मनोज कुमार यांना म्हणाल्या. हा मनोज कुमार यांच्यासाठी मोठा सन्मान होता.
मनोज कुमार यांच्या निधनाने शोककळा
मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांनी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. मनोज कुमार यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत.