Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बादशाह'च्या 'मन्नत'वर हिरेजडीत नेमप्लेट, फॅन्स म्हणाले शाहरुखच बॉलीवूडचा 'रईस'! पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:13 IST

बॉलीवूडचा 'बादशाह' अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला नेहमीच चाहत्यांचं आकर्षण राहिला आहे.

मुंबई-

बॉलीवूडचा 'बादशाह' अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला नेहमीच चाहत्यांचं आकर्षण राहिला आहे. अगदी बॉलीवूड तारकांनाही 'मन्नत'चं खूप अप्रूप आहे. शाहरुखसोबत फोटो टिपता नाही आला तरी 'मन्नत' समोर फोटो टिपून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज शेकडो फॅन्स त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करत असतात. आता 'मन्नत'च्या सौंदर्यात आणखी एक भर पडली आहे. शाहरुखच्या 'मन्नत'ला नवी नेमप्लेट मिळाली आहे. गेटवर हिरेजडीत नेमप्लेट आता चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नव्या नेमप्लेटचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

शाहरुखच्या फॅन क्लबनं 'मन्नत'चे काही फोटो शेअर केले आहेत. बंगल्याच्या गेटवर नवी नेमप्लेट बसवण्यात आली आहे. यात डायमंड्स आणि लाइट्सचा वापर करुन आकर्षक पद्धतीनं 'मन्नत' नाव साकारण्यात आलं आहे. रात्री लाइट्स चालू केल्यानंतर एलईडीच्या प्रकाशात आणि डायमंडच्या चकाकीनं 'मन्नत' नाव उजळून निघतं.

याआधी मन्नत बंगल्याची नेमप्लेट साध्या एका लाकडी बोर्डची होती. दोन महिन्यांपूर्वी मन्नतची नेमप्लेट काढण्यात आल्यानंतर शाहरुख आता आपल्या निवासस्थानाचं नाव बदलतोय की काय अशी चर्चा सुरू झाली होती. पण या सर्व चर्चा खोट्या असल्याचं नंतर समोर आलं आणि त्याच नावाची नवी नेमप्लेट तयार केली जात असल्यामुळे जुनी हटवण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. अखेर रविवारी 'मन्नत'ला नवी नेमप्लेट मिळाली आहे. फॅन्स आता या नेमप्लेट समोर उभं राहून सेल्फी टिपत आहेत.  

शाहरुख आता लवकरच पठाण या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या या अॅक्शन थ्रीलर सिनेमात शाहरुखसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन इब्राहिम पाहायला मिळणार आहे. २३ जानेवारी २०२३ रोजी सिनेमा चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड