Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापलेकीचं हळवं नातं! अशोक सराफ यांना पाहताच सायली संजीवने मारली मिठी, भावुक करणारा व्हिडिओ

By कोमल खांबे | Updated: April 8, 2025 14:04 IST

नशीब लागतं...! अशोक सराफ आणि सायली संजीवची गळाभेट, व्हिडिओ पाहून चाहते भावुक

दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते 'अशी ही जमवाजमवी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतंच 'अशी ही जमवाजमवी' या सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.  'अशी ही जमवाजमवी'च्या प्रिमियरला निवेदिता सराफही हजर होत्या. तर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मानलेली मुलगी आणि अभिनेत्री सायली संजीवनेही या ग्रँड प्रिमियरला हजेरी लावली होती. 

'अशी ही जमवाजमवी' सिनेमाच्या ग्रँड प्रिमियर सोहळ्यातील अशोक सराफ आणि सायली संजीव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अशोक सराफ यांना पाहताच सायली संजीव त्यांना मिठी मारत असल्याचं दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत ही अशोक मामांचीच मुलगी असल्याचं म्हटलं आहे. 

"ही मामांची हरवलेली मुलगी आहे असं वाटतं", "बापलेक", "कधी कधी खरंच वाटतं ही अशोक मामांची मुलगी आहे", "नशीब लागतं अशा बाप माणसाचं प्रेम मिळायला", "किती मस्त बाप लेकीचं नातं" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, 'अशी ही जमवाजमवी' हा सिनेमा येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होत आहे.  या सिनेमात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासोबत  सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. ‘राजकमल एंटरटेनमेंट’ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :अशोक सराफसायली संजीव