Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 13:36 IST

संकर्षणने महाराष्ट्रातील आगामी निवडणूक,  प्रचारसभा आणि मंत्रीमंडळ या सर्वांचा उल्लेख करत एक सुंदर कविता सादर केली आहे. 

नाटक व छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे घराघरांत लोकप्रिय झाला. उत्तम अभिनेत्याबरोबरच संकर्षण एक उत्तम कवी म्हणून देखील ओळखला जातो. काही दिवसांपुर्वी संकर्षणची राजकीय स्थितीवर भाष्य करणारी एक कविता खूप चर्चेत आली होती. आता राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यातच आता पुन्हा एकदा संकर्षणने महाराष्ट्रातील आगामी निवडणूक,  प्रचारसभा आणि मंत्रीमंडळ या सर्वांचा उल्लेख करत एक सुंदर कविता सादर केली आहे. 

नुकत्याच आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात संकर्षणने कविता सादर केली. तो म्हणतो "राजकारण आणि पांडुरंग हे दोन माझे आवडीचे विषय आहेत. त्या विषयाला अनुसरून मी काहीतरी लिहिलंय. बघा तुम्हाला आवडतंय का. जर तुम्हाला आवडली तर समजेल की बरं लिहलं आहे'. स्मृतिगंध मराठी च्या इन्स्टाग्राम अंकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आली आहे. 

 इथे वाचा संकर्षणची कविता

"सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पहावं.... महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पहावं....

 

मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं

मग ना पावसातल्या सभा, ना प्रचाराचा घाम.. तुझे स्टार प्रचारक देवा ग्यानबा तुकाराम

प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील... बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील...

सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरित काही घडणार नाही पांडुरंगा...आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही

तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटंल.. अजून तरी पांडुरंगा, तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटंल…

अन् मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही लवकर सुटंल...

पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील…

सगळ्यांत मोठा निर्णय पांडुरंगा असा घे.. .कायद्यासोबत गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे....

मग काय देवा कोण कायदा हातात घेईल.. अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल...

लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पहावं… (तुम्हाला वेगळा शब्द ऐकायची सवय आहे, माझ्या कवितेत वेगळं लिहिलंय) त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं..

आणि साक्षरतेचे विठ्ठला काय दिवस येतील... बुद्धिला वैभव आणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील...

अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं... जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं...

त्या तुकोबांच्या हाती दे हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून घे ताबडतोब त्यांच्या सह्या...

एकदम झाला आवाज हो.. लखलख वीज कडाडली. वीटेवरची सावली माऊली माझ्यावरती चिडली...

काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड हे... पांडुरंग म्हणाला... काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड आहे... 

हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे... या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस हो रे… 

राजकारणात त्यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे...

राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयस म्हणून केव्हाचा ऐकतोय…पण ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय...

माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला...

मला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता? अन् मग कसं काय रे त्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता?

या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत... डोक्यावरती घेतलंत पण डोक्यात नाही घातलं...

प्रत्येकात तुका, शिवाजी आहे... जर विचारांचा घेतला वसा...

सुराज्यासाठीच काम करा मग कुणीही खुर्चीत बसा...

आणि कर्तृत्त्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड… आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड...

आम्ही सगळे पाठिशी आहोत तुम्ही खुशाल राहा... अरे समोर महाराष्ट्र उभा आहे... त्याच्यात पांडुरंग पाहा...

 

टॅग्स :मराठी अभिनेतामहाराष्ट्रराजकारणनिवडणूक 2024