सन २००३ मध्ये प्रदर्शित ‘तेरे नाम’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. सलमान खानच्या करिअरच्या डुबत्या नौकेला तारणारा हाच तो चित्रपट. या चित्रपटानंतर सलमान ‘राधे’ नावाने ओळखला जाऊ लागला होता. या चित्रपटातील सलमानची हेअरस्टाईल इतकी अनोखी होती की, अनेक तरूणांनी या हेअरस्टाईलची कॉपी केली होती. १६ वर्षांनंतर हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा येऊ घातलेला सीक्वल.
होय,‘तेरे नाम’चा सीक्वल येतोय. सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम’ दिग्दर्शित केला होता. तेच ‘तेरे नाम 2’ दिग्दर्शित करणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम 2’ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. तूर्तास सतीश कौशिक पंकज त्रिपाठी स्टारर ‘कागज’ या चित्रपटात बिझी आहेत. हा चित्रपट हातावेगळा करताच ते ‘तेरे नाम 2’चे काम सुरु करणार आहेत. ‘तेरे नाम 2’संदर्भातील बातम्या ख-या आहेत. मी हा चित्रपट बनवतो आहे. सध्या मी यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांनी या सीक्वलसाठी भाईजान सलमान खानशी संपर्क साधला होता. पण सलमानने हा चित्रपट नाकारला. यानंतर कौशिक यांनी दोन नव्या कलाकारांना घेऊन ‘तेरे नाम 2’ बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय. अर्थात ‘तेरे नाम 2’मध्ये सलमान कॅमिओ रोलमध्ये दिसू शकतो, असेही म्हटले जातेय.
१६ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मध्ये सलमान खान व भूमी चावला लीड रोलमध्ये होते. हा चित्रपट ‘सेतू’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. याच चित्रपटादरम्यान अनुराग कश्यप व सलमान यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. आधी हा चित्रपट अनुराग दिग्दर्शित करत होता. पण सलमानसोबतचा पंगा त्याला इतका भोवला की, तो एका रात्रीत आऊट झाला आणि सतीश कौशिक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला.