Join us

'सैयारा' गाण्याची तरुणाईला भुरळ, 'या' २६ वर्षीय तरुणाच्या आवाजाची पसरली जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:03 IST

सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे यातील गाणी. 'सैयारा' हे टायटल साँग तर आज गल्लीबोळांपासून ते उच्चभ्रू घरांपर्यंत सगळीकडे वाजत आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'सैयारा' (Saiyaara) सिनेमा धुमाकूळ घालतोय. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाने तरुणाईला भुरळ घातली आहे. सिनेमाची जबरदस्त कमाईच सर्वकाही सांगून जाते. सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे यातील गाणी. 'सैयारा' हे टायटल साँग तर आज गल्लीबोळांपासून ते उच्चभ्रू घरांपर्यंत सगळीकडे वाजत आहे. तुम्हाला माहितीये का हे गाणं एका २६ वर्षीय तरुणाने गायलं आहे. कोण आहे तो?

ना अरिजीत सिंग, ना ज्युबिन नॉटियाल...'सैयारा' हे गाणं गाणारा तरुण आहे २६ वर्षीय गायक फहीम अब्दुल्ला (Faheem Abdullah). इतकंच नाही तर त्याचा मित्र अर्सलान निजामीसोबत मिळून त्याने गाणं कंपोजही केलं आहे. फहीमच्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. हे गाणं तरुणाईमध्ये चांगलंच ट्रेंडिंग आहे. फहीम काश्मिरचा आहे. याआधी त्याला 'The imaginary poet नावाने ओळखलं जायचं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने हे स्टेज नेम सोडलं.

फहीमचा संघर्ष

फहीमने मित्र अर्सलानसह मुंबईत येण्यासाठी खूप संघर्ष केला. मुंबईत १४ दिवस राहू शकू एवढे पैसे जमवले. जर १४ दिवसात काहीच झालं नाही तर परत निघून जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांना नशिबाची साथ मिळाली. १३ व्या दिवशी त्यांना संगीतकार तनिष्क बागची भेटले आणि हाच दिवस टर्निंग पॉइंट ठरला. त्यांचं नशीबच पालटलं. तनिष्कने त्यांना संधी दिली आणि सैयारा गाण्याची सुरुवात झाली. आज फहीमच्या चाहतावर्गात मोठी वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १.२ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. सैयारा आधी फहीमचं 'सिंगल' गाणंही हिट झालं होतं. याशिवाय 'सजदे', 'ए याद', 'झेलम' ही त्याची लोकप्रिय गाणी आहेत. 

टॅग्स :संगीतसेलिब्रिटीबॉलिवूड